Bilkis Bano Case : कायदेशीर लढाई सुरू ठेवणार बिल्किस बानो यांचा निर्धार; सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयावर व्यक्त केली नाराजी
न्यायालयाच्या या निर्णयावर तीव्र दुःख आणि अविश्वास व्यक्त करत बिल्किस बानो (Bilkis Bano Case) यांनी आपला पक्ष न ऐकताच हा आदेश दिल्याचे म्हटले आहे.

Bilkis Bano Case : 2002 च्या गुजरात दंगलीदरम्यान झालेल्या सामूहिक बलात्कार आणि कुटुंबातील १४ सदस्यांच्या हत्या प्रकरणातील दोन दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयावर तीव्र दुःख आणि अविश्वास व्यक्त करत बिल्किस बानो (Bilkis Bano Case) यांनी आपला पक्ष न ऐकताच हा आदेश दिल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे जुन्या भीती पुन्हा जाग्या झाल्या असून, आपण या आदेशाविरोधात कायदेशीर लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दोषींच्या सुटकेवर प्रतिक्रिया देताना बिल्किस बानो (Bilkis Bano Case) म्हणाल्या, मला अजूनही विश्वास बसत नाहीये की, पुन्हा एकदा, दुसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयाने मला बोलावल्याशिवाय किंवा माझे म्हणणे न ऐकताच असा आदेश दिला आहे. मला याबद्दलची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समजली. कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा बाजू मांडण्याची संधी न देता हा निर्णय घेतल्याने त्यांनी न्यायवस्थेवरील विश्वास डममगत असल्याबाबत चिंता व्यक्त केली.
२००२ च्या घटनेच्या वेळी अवघ्या १९ वर्षांच्या असलेल्या बिल्किस यांनी सांगितले की, कुटुंब आणि मित्रांच्या आधारावर त्यांनी आपले आयुष्य पुन्हा सावरण्यासाठी अनेक वर्षे घालवली आणि त्यांना आता शांतता मिळेल अशी आशा होती. मात्र, न्यायालयाच्या या ताज्या आदेशाने त्यांच्या जुन्या भीती पुन्हा जाग्या केल्या आहेत.
आज मला असे वाटतेय की, ज्या न्यायासाठी मी एवढी कठीण लढाई लढली, तो आता माझ्याकडून हिरावला जात आहे. जुन्या भीती पुन्हा समोर येत आहेत. मला माझ्या, माझ्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या सुरक्षेची पुन्हा एकदा भीती वाटू लागली आहे. मी (Bilkis Bano Case) या आदेशाविरोधात लढा देणार आहे, मला असे करावेच लागेल.






