मोठी बातमी: बिल्किस बानोप्रकरणातील आरोपींच्या शिक्षेला स्थगिती; जामीन मंजूर
Bilkis Bano case : दोन्ही अपीलकर्ते १७ वर्षांहून अधिक काळ कोठडी

Bilkis Bano case : सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्येप्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन दोषींना दिलासा दिला आहे. न्यायालयाने विपिन जोशी उर्फ लाला डॉक्टर आणि प्रदीप रमनलाल मोढिया यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने या दोन्ही दोष्यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर केला आहे. दोन्ही दोषी १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत आणि त्यातील एक दोषी गंभीररीत्या दिव्यांग असल्याची बाब लक्षात घेत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराले यांच्या खंडपीठाने २८ ऑक्टोबर रोजी, या दोन दोषींनी दाखल केलेल्या अपिलांवर सुनावणी करताना हा आदेश दिला.
प्रकरण काय आहे?
२००२ च्या गुजरात दंगलीतील बिल्किस बानोवरील सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येशी संबंधित आहे. दंगलीदरम्यान दाहोद जिल्ह्यातील रंधिकपूर गावातील बिल्किस आपल्या कुटुंबातील १६ सदस्यांसह पळून जाऊन शेजारच्या छापरवाड गावच्या शेतात लपली होती. ३ मार्च २००२ रोजी तिथे २० हून अधिक दंगेखोरांनी हल्ला केला. ५ महिन्यांच्या गर्भवती बिल्किससह इतर काही महिलांवर बलात्कार करण्यात आला. बिल्किसच्या ३ वर्षांच्या मुलीसह ७ जणांची हत्या करण्यात आली.
सुप्रीम कोर्टाने पाठवले होते तुरुंगात
या प्रकरणात 2008 मध्ये 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु ऑगस्ट 2022 मध्ये गुजरात सरकारने त्यांची शिक्षा माफ केली होती. त्यानंतर 8 जानेवारी 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानोच्या सर्व 11 दोषींची सुटका रद्द केली आणि सर्व दोषींना दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने 11 दोषींचा मुदतपूर्व सुटकेचा आदेश रद्द केल्याने त्यांना तुरुंगात परत जाण्यास भाग पडले.
हेही वाचा:





