नाम परिषदेत जयशंकर यांंच्या द्विपक्षीय बैठका

कपाला (युगांडा) – नॉन अलाइन्ड मुव्हमेंटच्या परिषदेच्या निमित्ताने युगांडाची राजधानी कंपाला येथे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटरेस आणि सुमारे अर्धा डझन देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. या देशांमध्ये श्रीलंका आणि इराणच्या प्रमुख नेत्यांचाही समावेश होता. यावेळी द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक मुद्यांबरोबर जागतिक पातळीवरील महत्वाच्या विषयांवरही चर्चा झाली.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटरेस यांच्याबरोबर संयुक्त राष्ट्रातील सुधारणा, सागरी सुरक्षा आणि युक्रेनमधीलसंघर्षाबाबत चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नाम परिषदेच्या निमित्ताने जयशंकर यांनी इराणचे उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर, कोलंबियाचे परराष्ट्र मंत्री लवारो लेवा डर्न आणि फिलिपाइन्सचे परराष्ट्र व्यवहार सचिव एनरिक ए मानालो यांचीही भेट घेतली.
इराण आणि कोलंबियाच्या नेत्यांशी द्विपक्षीय संबंधांबरोबर अलिकडच्या काळातील महत्वाच्या घडामोडींवरही चर्चा झाली. तसेच लिपाईन्सच्या परराष्ट्र व्यवहार सचिवांबरोबर सुरक्षा भागीदारी, स्थैर्य आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील कायद्याच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा करण्यात आली, असेही जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
श्रीलंकेचे अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांच्याशीही जयशंकर यांनी द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीबाबत चर्चा केली. त्यांनी बांगलादेशचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री मोहम्मद हसन महमूद यांचीही भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधांची प्रशंसा केली. त्यांनी पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल-मलिकी यांची भेट घेतली आणि गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर विस्तृत आणि व्यापक चर्चा केली. युगांडाचे परराष्ट्र मंत्री जनरल ओडोंगो जेजे यांच्याशीही जयशंकर यांनी द्विपक्षीय चर्चा केली.
शुक्रवारी जयशंकर यांनी बहरीन, सर्बिया, बोलिव्हिया, अझरबैजान आणि व्हेनेझुएला मधील परराष्ट्र मंत्र्यांशीही द्विपक्षीय बैठका घेतल्या.
कंपाला येथील नाम परिषदेची सांगता झाल्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या नायजेरियाच्या भेटीवररवाना झाले आहेत.





