पुणे जिल्हा | रेल्वेगेट ओलांडताना दुचाकीस्वारांची होतेय घसरगुंडी

वाल्हे, (वार्ताहर)- पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील, पुणे- मिरज लोहमार्गावर, वाल्हे – नीरा (ता. पुरंदर) दरम्यानच्या पिसुर्टी रेल्वे फाटक क्रमांक 27 किलोमीटर 79/01 या रेल्वे फटकातील लोहमार्ग ओलांडणे, मागील काही दिवसांपासून दुचाकीस्वारांना जिकिरीचे बनले आहे.
पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावरील या रेल्वेगेट मधील लोहमार्गाचे विस्तारीकरणाचे काम मागील वर्षांपूर्वी गतीने पूर्ण करण्यात आले आहे; मात्र मोठ्या प्रमाणावर वर्दळीच्या पालखी महामार्गावरील पिसुर्टी रेल्वेगेटमधील लोहमार्ग ओलांडताना अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात होऊ लागले आहेत. यामुळे अनेकजण कायमचेच जायबंदी होत आहेत. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही दखल घेतली नसल्याने, प्रवाशी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नव्याने दुसर्या रेल्वे लाइनचे करण्यात आलेल्या कामाच्या ठिकाणी व जुन्या रेल्वे रुळाचे घर्षण झाल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत. याच परिसरात अनेक लहान – मोठे खड्डे पडले असून, या ठिकाणी दुचाकी लोहमार्गावर जात असताना महामार्गापेक्षा जुना लोहमार्ग थोडा उंच, तसेच रस्त्यावरील वाहने तिरकी जात असल्याने लोहमार्गाच्या अगदी जवळच रस्ता खराब झाल्याने, लोहमार्गावरून अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत.
रेल्वे गेटच्या जागी उड्डाणपूल आवश्यक
देखभाल- दुरुस्ती कामासाठी अनेक वेळेस पालखी महामार्गावरील पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील रेल्वेगेट बंद ठेवण्यात येत असतो. यामुळे प्रवाशीवर्गाला मोठा वळसा घालून इच्छित स्थळी पोहोचावे लागते. पुणे – पंढरपूर पालखी महामार्ग हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग झालेले 8 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता निरा शहराला बायपास रस्ता पिसुर्टी, जेऊर या गावांच्या हद्दीतील शेतातून गेला आहे.
मात्र, आताच्या मार्गावरुनच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरला जाईल. सद्यःस्थितीत पालखी महामार्गावरून दिवसभरात अनेक प्रवाशी प्रवास करीत असून, दिवसभरात अनेकांना रेल्वे आल्यानंतर, फाटक बंद असल्याने, ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे गेटच्या जागी उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक आहे.





