पुणे जिल्हा | ऑक्टोबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा

वाल्हे, (वार्ताहर) – राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत असून काही ठिकाणी पूर ही आले आहेत. मात्र पुरंदरमधील वाल्हे गावांच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अतिअल्प प्रमाणात असल्याने येथील वाड्या-वस्त्यांवर पुढील एक-दीड महिन्यांतच तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होईल, अशी भिती येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
वाल्हे गावाच्या पूर्वेकडील भागात असलेल्या वाड्या-वस्त्यांवरील वागदरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील,पवारवाडी, झापाचीवाडी, भैरजीचीवाडी, मोरूजीचीवाडी, वडाचीवाडी, बाळाजिचीवाडी तसेच सुकलवाडी ग्रामपंचायत हद्दीत वाड्या-वस्त्यांवर तसेच वाल्हे ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाडवाडी, अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी,
कमठवाडी, भुजबळ कामठवाडी, माळवाडी तसेच दौंडज ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-वस्त्या या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने,जर पुढील काही दिवसांत मोठा पाऊस पडला नाही तर सद्यःस्थितील पाणी पुढील दीड-दोन महिन्यापर्यंतच टिकेल.
मात्र, यानंतर टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करावा लागेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पिकांची लागवड करावी की नाही?
या परिसरात रिमझीम पाऊसावर खरीप हंगामातील पिके चांगली आली होती. या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असून रब्बी हंगामातील पिकांची लागवड करावी की नाही ? अशा द्विधामस्थितीत शेतकरीवर्ग आहे.
उपलब्ध पाणीसाठ्याने गाठला तळ
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज खिंड परिसरात मागील दोन महिन्यापुर्वी रिमझीम पाऊसाने परिसरातील बंधारे भरून ओसंडून वाहत होते.मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने उपलब्ध पाणीसाठ्याने तळ गाठला असून यामुळे शेतकरीवर्गाची चिंता वाढू लागली आहे.
गेल्यावर्षीची पुनरावृत्ती उद्भवणार?
वाल्हे गावच्या पश्चिम दिशेस 10 किलोमीटर अंतरावर असलेले वीर धरण मागील दीड- दोन महिन्यांत भरून निरा नदी तुडूंब भरून वाहत आहे.मात्र, वाल्हे, दौंडज गाव तसेच परिसरातील अनेक गावांत समाधानकारक पाऊस पडला नसल्याने नदीकाठच्या परिसरात पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे.
मात्र,परिसरातील 10 किलोमीटरच्या भागात अतिअल्प प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने, मागील वर्षासारखीच पाणीटंचाईची पुनरावृत्ती उद्भवती की काय ? या विचाराने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत आहेत.





