पारगाव (ता. आंबेगाव) : मौजमजा करण्यासाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीला पारगाव पोलिसांनी जेरबंद करत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २७ मोटरसायकली हस्तगत केल्या असून एकूण १६ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पारगाव पोलीस ठाण्याच्या या यशस्वी कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पारगाव पोलिसांनी सापळा रचून रितेश फकीरा रोकडे (वय १८, रा. चांडोह, ता. शिरूर), हर्षद जालिंदर ढवळे (वय २१, रा. फाकटे, ता. शिरूर) आणि प्रथमेश दत्तात्रय ढवळे (वय १९, रा. फाकटे, ता. शिरूर) यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेल्या २७ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर २०२५ रोजी जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथून एक अॅक्टिव्हा स्कुटी चोरीला गेल्याची तक्रार पारगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून सापळा रचला. तपासादरम्यान आरोपींच्या अटकेनंतर त्यांच्या चौकशीतून पुणे, अहिल्यानगर आणि जळगाव येथील पोलीस ठाण्यांतील मोटरसायकल चोरीचे गुन्हेही उघडकीस आले. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, तसेच पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे आणि अविनाश कालेकर यांनी या कामगिरीत मोलाचा सहभाग घेतला. दरम्यान, पारगाव पोलिसांनी गेल्या वर्षभरात मंदिरातील चोरी व मोबाईल चोरीचेही अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. ७ ऑगस्ट २०२४ रोजी शिरूर, आंबेगाव, खेड व रांजणगाव परिसरातील मंदिरांमध्ये झालेल्या चोऱ्यांमध्ये देवाचे मुखवटे, सोन्याचे दागिने व दानपेटीतील रोकड चोरीस गेली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांना अटक करून ४ लाख रुपये किमतीचा ऐवज संबंधित मंदिरांच्या ताब्यात दिला होता. तसेच २०२५ मध्ये हरवलेल्या मोबाईल प्रकरणात २५ मोबाईल फोनचा शोध लावून सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी यापूर्वी पुणे गुन्हे शाखेत कार्यरत असताना अनेक गुन्ह्यांची यशस्वी उकल केली असून त्यांचा गुन्हे तपासाचा आलेख सातत्याने उंचावत राहिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने वर्षभरात मंदिर चोरी, मोबाईल चोरी आणि आता मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून प्रभावी कामगिरी बजावली आहे.