Bihar Politics : बिहारमध्ये खेला होबेची शक्यता? मित्रपक्षांच्या आमदारांनी घेतली नितीन नबीन यांची भेट

पाटणा : बिहार निवडणूकीत भाजप व जेडीयूसह मित्रपक्षांनी जोरदार मुसंडी मारताना, पुन्हा एकदा बिहार काबिज केले होते. त्यानंतर आता एनडीएतील सहकारी मित्र असलेल्या आरएलएमचे तीन आमदार थेट भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतल्याने बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आपल्या निवासस्थानी लिट्टी चोखाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र आरएलएमचे आमदार माधव आनंद, रामेश्वर महतो आणि आलोक सिंह हे या कार्यक्रमासाठी अनुपस्थित राहिले. मात्र त्यावेळी हे तीनही आमदार राजधानी पटणामध्येच होते. त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. त्यामुळे या घटनेला आता महत्व प्राप्त झाले आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांची भेट आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निमंत्रणाला डावलणे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना वेग आला आहे. हे आमदार नाराज असून ते सामूहिकपणे एखादा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत असे बोलले जाते. या आमदारांचे पुढील पाऊल काय असणार हे सध्या अस्पष्ट आहे. जपाचे कार्याध्यक्ष नबीन यांच्यासोबत झालेली भेट औपचारिक असल्याचे आमदारांकडून सांगण्यात येत असले तरी देखील नक्की काय आमदारांमध्ये नक्की काय शिजत आहे, यावर उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
केवळ भाषणांनी यश मिळत नाही…
अलीकडेच आरएलएम आमदार रामेश्वर महतो हे नाराज असल्याचे माध्यमांसमोर आले होते. राजकारणात यश केवळ भाषणांनी मिळत नाही, तर खऱ्या हेतूंनी आणि मजबूत धोरणांनी मिळते. जेव्हा नेतृत्वाचे हेतू अंधुक होतात आणि धोरणे सार्वजनिक हितापेक्षा स्वार्थाकडे वळू लागतात, तेव्हा जनतेला गोंधळात टाकता येत नाही. आजचा नागरिक जागरूक आहे – तो प्रत्येक पाऊल, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक हेतू बारकाईने तपासतो, अशी त्यांनी आपल्या सोशल मिडीयावर लिहिताना एक इशारा दिला होता.





