Bihar Election Survey 2025: कोण होणार बिहारचा सत्ताधीश? सर्वेत NDAला धक्का…

Bihar Election Survey 2025: बिहारमध्ये 2025 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेच्या मनातील मुद्दे, मतांचे गणित आणि मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय चेहरा याबाबत ‘वोट व्हाइब’ने ‘आज तक’ या वृत्तवाहिनीसाठी एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात एनडीए आणि महागठबंधन यांच्यातील चुरस, प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाची स्थिती आणि मुख्यमंत्रीपदासाठी जनतेची पसंती याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बिहारच्या राजकीय चित्राचा अंदाज घेण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरेल, असे मानले जात आहे.
बिहार निवडणूक 2025: सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्ष
प्रश्न: तुम्ही कोणाला मतदान कराल?
सर्वेक्षणानुसार, सध्या एनडीएचा कौल किंचित पुढे आहे. 36.2% लोकांनी एनडीएला मत देण्याची इच्छा व्यक्त केली, तर महागठबंधनला 35.8% लोकांचा पाठिंबा मिळाला. इतर पक्षांना 12.8% मते मिळण्याचा अंदाज आहे. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला 8.7% लोकांनी पसंती दर्शवली, तर 6.5% लोकांनी ‘माहीत नाही’ असे उत्तर दिले.
प्रश्न: बिहारचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहू इच्छिता?
मुख्यमंत्रीपदाच्या लोकप्रियतेत तेजस्वी यादव 33.5% मतांसह आघाडीवर आहेत. सध्याचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना 24% लोकांनी पसंती दर्शवली. प्रशांत किशोर 13.7% मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना 8.3% आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना 5.2% लोकांनी पसंती दिली.
प्रश्न: मतदानाचा आधार काय असेल?
बिहारमध्ये मतदानात जातीचा प्रभाव मोठा मानला जातो, परंतु सर्वेक्षणात वेगळेच चित्र समोर आले. 23.6% लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार असल्याचे सांगितले. 20.1% लोक नीतीश कुमार यांच्या विकासकामांवर आधारित मतदान करतील. पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मत देणाऱ्यांचे प्रमाण 13.7% आहे. विशेष म्हणजे, केवळ 0.9% लोकांनी जाती-धर्माच्या आधारावर मतदान करणार असल्याचे सांगितले.
प्रश्न: नीतीश सरकारबाबत सत्ताविरोधी किंवा समर्थनाची लाट किती आहे?
गेल्या 20 वर्षांपासून नीतीश कुमार बिहारच्या सत्तेवर आहेत. सध्याच्या सर्वेक्षणात 48% लोकांमध्ये सत्ताविरोधी लाट दिसून आली, तर 27.1% लोकांनी नीतीश यांच्या समर्थनात मत व्यक्त केले. 20.6% लोकांनी सामान्य मत व्यक्त केले.
प्रश्न: सध्याचे आमदार पुन्हा निवडणूक लढवले तर त्यांना मत द्याल?
या प्रश्नावर सत्ताविरोधी भावना स्पष्ट दिसून आली. केवळ 31.8% लोकांनी सध्याच्या आमदारांना पुन्हा मत देण्याची तयारी दर्शवली, तर 53.5% लोकांनी सध्याच्या आमदारांना मत न देण्याचा निर्णय घेतला आहे. 14.7% लोकांनी याबाबत अनिश्चितता दर्शवली.
दरम्यान, बिहारच्या निवडणूक रणधुमाळीत एनडीए आणि महागठबंधन यांच्यात काट्याची टक्कर आहे. प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असला तरी त्याची गती लक्षणीय आहे. मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांचा कौल आघाडीवर आहे, तर नीतीश कुमार यांच्याविरोधात सत्ताविरोधी लाट दिसत आहे. विकास हा मतदारांचा प्रमुख मुद्दा असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. बिहारच्या सत्तेच्या रणसंग्रामात कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बिहार विधानसभा निवडणूक २०२५: राजकीय उलथापालथींचा रंगमंच –
बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत मतदार यादी जून-जुलैमध्ये तपासली, ज्यात ७.६४ कोटी मतदार नोंदवले गेले. सप्टेंबरमध्ये अंतिम यादी प्रसिद्ध होईल आणि निवडणूक वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी एनडीए (बीजेपी-जेडीयू-एलजेपी) नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात सत्तेत आहे, तर विरोधी महागठबंधन (आरजेडी-काँग्रेस-लेफ्ट) तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात जोरदार मोहीम राबवत आहे.
प्रशांत किशोर यांची जन सुराज पक्ष सर्व २४३ जागांवर स्वतंत्र लढणार असून, विकास आणि बेरोजगारीवर भर देत तिसरा पर्याय म्हणून उदयास येत आहे.२०२० च्या निवडणुकीत एनडीएने १२५ जागा मिळवून नीतीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, तर महागठबंधनला ११० जागा मिळाल्या. आरजेडी सर्वाधिक ७५ जागांसह आघाडीवर राहिली. मध्येच २०२२ मध्ये नीतीश यांनी एनडीए सोडून महागठबंधनसोबत जाऊन सरकार स्थापन केले, पण डिसेंबर २०२३ मध्ये पुन्हा एनडीएशी जुळवून घेतले. बेरोजगारी, स्थलांतर आणि जातीय समीकरणे प्रमुख मुद्दे असून, राहुल गांधींची ‘वोटर अधीकार यात्रा’ आणि किशोरांची पदयात्रा चालू आहेत.





