Bihar Election 2025 : “जंगलराज करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही…’; पंतप्रधान मोदींचा जोरदार प्रहार !

Bihar Election 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिहारमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी महागठबंधनावर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “सणांचा उत्साह सुरू आहे आणि छठी माईच्या पूजेची तयारी जोमात सुरू आहे.
त्याचबरोबर बिहारमध्ये लोकशाहीचं महापर्वही साजरं होत आहे. ही निवडणूक बिहारच्या समृद्धीचा नवा अध्याय लिहिणार आहे आणि यात बिहारच्या युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बिहारचे लोक जंगलराज करणाऱ्यांना कधीच माफ करणार नाहीत, कारण त्यांनी त्या काळातील अराजकता विसरलेली नाही.” असं मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “जे स्वतःला गठबंधन म्हणवतात, बिहारची जनता त्यांना ‘लठबंधन’ म्हणते. कारण ते फक्त लठ चालवणं आणि भांडणं यातच पटाईत आहेत. या लठबंधनवाल्यांसाठी स्वतःचा स्वार्थच सर्वात महत्त्वाचा आहे. त्यांना बिहारच्या तरुणांची अजिबात काळजी नाही.
दशकानुदशकं बिहार आणि देशातील युवक नक्षलवाद आणि माओवादी दहशतीमुळे त्रस्त होते, पण या लोकांनी बिहारच्या जनतेपेक्षा स्वतःच्या फायद्यालाच प्राधान्य दिलं. अनेक वेळा त्यांनी माओवादी शक्तींच्या मदतीनेच निवडणुका जिंकल्या आहेत.”
“बिहारच्या दोन पिढ्यांचं भविष्य उद्ध्वस्त केलं”
मोदी म्हणाले, “बिहारच्या विध्वंसात नक्षलवाद आणि माओवादी दहशतीची मोठी भूमिका राहिली आहे. हे माओवादी शाळा, महाविद्यालय, रुग्णालय उभारू देत नसत, आणि जे संस्थान तयार झाले होते त्यांना बॉम्बनं उडवत असत.
उद्योगधंदे सुरु होऊ नयेत म्हणून त्यांनी अडथळे निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या सत्ताकाळात विकास पूर्णपणे ठप्प झाला. माझ्या मते, त्यांनी बिहारच्या दोन पिढ्यांचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे.”
“NDA ने बिहारला जंगलराजच्या अंधारातून बाहेर काढलं”
मोदी म्हणाले, “२०१४ नंतर आम्ही बिहारसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. एनडीएने बिहारला जंगलराजच्या अंधारातून बाहेर काढून विकासाच्या नव्या प्रकाशात आणलं आहे. आज बिहार नक्षलवाद आणि माओवादी दहशतीपासून मुक्त होण्याच्या दिशेनं जलदगतीने वाटचाल करत आहे. बिहारच्या युवकांचं भविष्य सुरक्षित करणं ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती प्रामाणिकपणे पार पाडत आहोत.”
पंतप्रधान म्हणाले, “आज देशभरात विकासाचा महायज्ञ सुरू आहे आणि बिहारही या यज्ञात खांद्याला खांदा लावून सहभागी झाला आहे. राज्यात प्रत्येक क्षेत्रात काम सुरू आहे. कुठे नवीन रुग्णालयं उभी राहत आहेत, कुठे शाळा बांधल्या जात आहेत, तर कुठे नवे रेल्वेमार्ग तयार होत आहेत.
याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बिहार आणि देशात स्थिर सरकार असणं. स्थैर्य असलं की विकास वेगाने होतो. बिहारमधील एनडीए सरकारची खरी ताकद हीच स्थिरता आहे, म्हणूनच आज बिहारचा प्रत्येक युवक आत्मविश्वासाने म्हणतो ‘रफ्तार पकडलेला बिहार, पुन्हा NDA सरकार!’” असं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.





