Bihar Election 2025: मतदानावेळी बुरखा घालणाऱ्या महिलांवर कडक नजर, ओळख पडताळणीसाठी आयोगाचे विशेष नियोजन

पटना : बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडेल.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत या तारखांची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात 121 तर दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. यावेळी त्यांनी सांगितले की, मतदानादरम्यान ‘बुर्कानशीन’ (बुर्का घालणाऱ्या) किंवा ‘पर्दानशीन’ (घुंगट घेणाऱ्या) महिलांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
आंगनवाडी सेविका करतील ओळख पडताळणी
ज्ञानेश कुमार म्हणाले, “बुर्का किंवा घुंगट परिधान केलेल्या महिला मतदारांच्या ओळखीबाबत शंका निर्माण झाल्यास मतदान केंद्रावर उपस्थित आंगनवाडी सेविका त्यांच्या ओळखीची पडताळणी करतील. आयोगाने यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत आणि त्यांचे काटेकोर पालन केले जाईल.”
भाजपकडून आलेली मागणी
यापूर्वी बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी निवडणूक आयोगाकडे अशीच मागणी केली होती. त्यांनी सांगितले होते की, “बुर्का परिधान करून मतदान केंद्रावर येणाऱ्या महिलांच्या चेहऱ्याची तुलना त्यांच्या मतदार ओळखपत्राशी केली जावी, जेणेकरून केवळ खरे मतदारच मतदान करू शकतील.”
‘बिहार फर्स्ट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत 17 नवे उपक्रम
या निवडणुकीत आयोगाने ‘बिहार फर्स्ट इनिशिएटिव्ह’ नावाने 17 नवे उपक्रम जाहीर केले आहेत. यात सर्व मतदान केंद्रांवर अनिवार्य वेबकास्टिंग, केंद्राबाहेर मोबाईल फोन जमा करण्याची सुविधा, आणि प्रत्येक केंद्रावर 1200 मतदारांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच, ईव्हीएम मतपत्रांवर उमेदवारांचे रंगीत फोटो दिसतील, ज्यामुळे मतदारांना ओळख सोपी होईल.
दरम्यान, सध्याच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने वेळेत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
या सर्व उपाययोजनांमुळे बिहारमधील मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह होईल, असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.





