Maharashtra Politics : शिवानी वडेट्टीवार आणि केतन ठाकरेला मोठा दिलासा

नागपूर : युवक काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. पक्षशिस्त मोडल्याच्या कारणावरून चार प्रमुख पदाधिकाऱ्यांना संघटनेतून कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आले आहे. प्रदेश उपाध्यक्ष तनवीर अहमद, महासचिव अनुराग भोयर, सचिव अक्षय हेटे आणि नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांना संघटनेतून डच्चू देण्यात आला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे यापूर्वी संघमुख्यालयासमोरील आंदोलनात गैरहजर राहिलेल्या ६० पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांचाही समावेश होता. मात्र, आताच्या कारवाईत या दोघांना वगळण्यात आले आहे.
युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय चिकारा यांनी हा निष्कासनाचा आदेश काढला असून त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवण्यात आली आहे. याआधी कुणाल राऊत यांच्या कार्यपद्धतीविरोधात अनेक तक्रारी दिल्लीपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने संघटना चालवत असल्याचा आरोप होता. त्यानंतर त्यांना कार्यकारी अध्यक्षपदावर आणून त्यांचे अधिकार कमी करण्यात आले होते.





