Puja Khedkar : पूजा खेडकरला मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Puja Khedkar । वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून आयएएस पद गमावलेल्या पूजा खेडकरवर गुन्हा दाखल झालेला आहे.
उच्च न्यायालयाने अटकपूर्वी जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात तिला सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. २०२२ मधील नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी, दिव्यांग आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासह इतर आरोप खेडकरवर आहेत.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर हिला फसवणूक प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
दिल्ली पोलिसांच्या बाजू मांडणाऱ्या वकिलांनी खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास जोरदार विरोध दर्शवला. त्या तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत पोलिसांनी तिच्या जामीनाला विरोध केला.
SC grants anticipatory bail to ex-IAS probationer Puja Khedkar in UPSC cheating case
— Press Trust of India (@PTI_News) May 21, 2025
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पूजा ही 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असल्याचं सांगितलं गेलं. जून 2024 महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या, त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत.
त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर ते अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली होती. तर, आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आलं होतं.
मात्र, पूजा खेडकर हिने खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला आणि महाराष्ट्र सरकारचं चिन्ह लावलं होतं. त्यांच्या कारनाम्याचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर स्वत:ला गरीब आणि दृष्टीदोष असल्याचं सांगणाऱ्या अधिकारी इतक्या महागड्या ऑडी कारमधून कशा फिरतात असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. यानंतर हा वाद वाढत गेल्याने पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली. आता या प्रकरणात मोठे खुलासे झाल्याने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत पूजा खेडकर यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.





