पुणे : वादग्रस्त अधिकारी आणि भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, मनोरमा दिलीप खेडकर (४८, रा. नॅशनल हाऊसिंग सोसायटी, बाणेर) आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २२१, २३८ आणि २५३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? नवी मुंबईत एका ट्रकने मोटारीला धडक दिल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर मोटारचालकाने ट्रकचालकाला धमकावून अपहरण केल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. या प्रकरणी रविवारी (१४ सप्टेंबर) नवी मुंबई पोलिसांचे पथक तपासासाठी पुण्यातील खेडकर यांच्या बंगल्यात गेले. तेव्हा मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी सहकार्य न करता बंगल्याचा दरवाजा बंद केला आणि आरोपी मोटारचालकाला पसार होण्यास मदत केली, असा आरोप पोलिसांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना अडवण्यासाठी बंगल्यातील पाळीव श्वान सोडल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.