प्रभात वृत्तसेवा पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित केलेल्या पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी चतुश्रृंगी पोलीस खेडकर यांच्या घरी तपासासाठी गेले असता, घरात फक्त नोकर होते. खेडकर कुटूंब घरातून पसार झाले होते. नेमके झाले काय? नवी मुंबईत एका ट्रकने खेडकर कुटूंबाच्या कारला शनिवारी धडक दिली. कारमध्ये पूजा खेडकरचे आई-वडिल होते. खेडकर यांच्या मोटार चालकाने ट्रकचालकाला धमकावून, त्याच्या क्लिनरला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्याला आम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात नेतो, तेथे तु ये असे ट्रक चालकाला सांगितले. तो जेव्हा पोलीस ठाण्यात गेला, तेव्हा तेथे कोणीच नव्हते. बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने क्लिनरचे अपहरण केल्याची तक्रार दिली. रविवारी नवी मुंबईचे पोलीस पथक खेडकर यांच्या बंगल्यावर आले तेव्हा घरातील मनोरमा खेडकर यांनी सहकार्य करण्याऐवजी दरवाजा बंद केला. आरोपी असलेल्या मोटारचालकाला मोटारीसह पसार होण्यास मदत केली. चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना अडवण्यासाठी बंगल्यातील पाळीव श्वानही मोकळे सोडले. यामुळे रबाळेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली. याची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मनोरमा खेडकर आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला. दरम्यान, सोमवारी चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने खेडकर यांच्या घरी गेले, तेव्हा घरामध्ये खेडकर कुटूंबाचा एकही सदस्य नव्हता. तेथे फक्त नोकरवर्ग होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत. अपहृत क्लिनरचा जबाब.. खेडकर कुटूंबाने क्लिनरला शनिवारी रात्रभर त्यांच्या घरात कोंडवून ठेवले होते. रविवारी सकाळी त्याला सोडून देण्यात आले. सुटका झाल्यानंतर क्लिनरने चालकाशी संपर्क साधला. यानंतर त्याला रबाळे पोलिसांनी ठाण्यात नेऊन जाब जबाब नोंदवला. वादग्रस्त कुटुंब.. मनोरमा खेडकर यांच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झाले आहेत. मुळशी तालुक्यातील जमिनीच्या वादातून त्यांनी शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पौड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. पूजा खेडकरने प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याने तिची चौकशी झाली आहे. दिल्ली पोलिसांनी तिच्यावर गुन्हा नोंदवला आहे.