साताऱ्यात मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसचा ‘हा’ नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? अजित पवारांच्या दौऱ्यामुळे चर्चांना उधान

सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे साताऱ्यातील कराड दौऱ्यावर आले आहेत. अजित पवार यांचा कराड दौरा चर्चेचा बनला आहे. येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
अजित पवारांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होत दर्शन घेतले आहे. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या कोयना बँकेत ते गेले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या या भेटीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहात उदयसिंह यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केल्या जात होत्या.
अजित पवार हे आज १२ मार्च रोजी कोयना बँकेत चहापान व नाश्त्यासाठी पोहचले आहेत. या ठिकाणी उदयसिंह यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. उदयसिंह यांचा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव झाला. तसेच राज्यात महाविकास आघाडी पराभूत झाली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते नाराज आहेत. त्याऐवजी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहावे असे उदयसिंह यांनी ठरवल्याचे सांगितले जात आहे.
कोण आहेत उदयसिंह पाटील-उंडाळकर?
राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील-उंडाळकर सध्या काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. मात्र, आता ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अपक्ष लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.





