मोठी बातमी: उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड कुठे गेले? अखेर पत्ता लागला!

नवी दिल्ली: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी तब्येतीच्या कारणास्तव 21 जुलै 2025 रोजी उपराष्ट्रपतीपदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठावठिकाण्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. विरोधी पक्षांनी तर धनखड यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता अखेर जगदीप धनखड यांच्याबाबत माहिती समोर आली आहे. माजी उपराष्ट्रपती सध्या दिल्लीतील उपराष्ट्रपती निवासस्थानातच राहत असून, लवकरच ते नव्या सरकारी निवासस्थानी स्थलांतर करणार आहेत.
धनखड यांचा ठावठिकाणा उघड
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या प्रशासकीय किंवा सार्वजनिक संपर्काची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. यामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. काहींनी तर धनखड यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत सरकारने त्यांच्याबाबत माहिती जाहीर करावी, अशी मागणी लावून धरली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार, धनखड हे सध्या उपराष्ट्रपती निवासस्थानातच राहत असून, त्यांच्या नव्या निवासस्थानासाठी शिफ्टिंगची तयारी सुरू आहे. ते लवकरच ल्युटन्स दिल्लीतील Type VIII सरकारी बंगल्यात स्थलांतर करणार आहेत, जे दिल्लीतील एक प्रतिष्ठित निवासस्थान आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा ठावठिकाणा समजत नसल्याने विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी चक्क ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचा उल्लेख करत धनखड यांना ‘लापता उपराष्ट्रपती’ संबोधलं. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून धनखड यांच्या स्वास्थ्य आणि सुरक्षिततेबाबत माहिती देण्याची मागणी केली. “जर सरकारने धनखड यांच्याबाबत स्पष्ट माहिती दिली नाही, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ,” असा इशाराही राऊत यांनी दिला होता.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. 9 सप्टेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी पूर्ण होईल. या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट आहे, तर 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
धनखड यांच्या राजीनाम्यामागे केंद्र सरकारसोबत मतभेद असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यांच्या अचानक राजीनाम्याने आणि त्यानंतरच्या गूढ परिस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. आता धनखड यांचा ठावठिकाणा समोर आल्याने या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. तरीही, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हं आहेत.




