मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांकडे असणाऱ्या खात्यांचा तात्पुरता भार ‘या’ मंत्र्यांच्या खांद्यावर ; कारण…

मुंबई : आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. यादरम्यान एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचा तात्पुरता भार शिंदे गटातील इतर मंत्र्यावर सोपवला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिवेशनाच्या कालावधीत विधानसभा आणि विधानपरिषदेत या खात्याच्या येणाऱ्या संबंधित प्रश्नावर हे मंत्री उत्तर देतील. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली काही खाती इतर मंत्र्यांना देण्यात आली. त्यात गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भूसे यांना परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे परिवहन खाते देण्यात आले आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मंत्रिपदासाठी भाजप तसेच शिंदे गटातील आमदार उत्सुक होते. मात्र, अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समावेश झाला. त्यानंतर पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर या मंत्र्यांच्या खातेवाटपावरून युती सरकारमध्ये रस्सीखेच सुरू झाली.
दरम्यान, खातेवाटप झाले, पण मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र लांबणीवर पडला. आता पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे.





