Sunetra Pawar : मोठी बातमी! नरहरी झिरवळांवर सुनेत्रा पवारांची नाराजी; बैठकीत स्पष्ट शब्दांत म्हणाल्या “स्वतःची आणि…”
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाऊलावर पाऊल टाकत कामाचा सपाटा सुरु केला आहे. काल त्यांनी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर कोअर कमिटीमधील वरिष्ठ नेत्यांची एक वेगळी बैठक पार पडली.
या बैठकीत सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar)अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवळ मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकाने लाच स्विकारल्याच्या प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नरहरी झिरवळ यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपीक राजेंद्र ढेरिंग याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ३५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. चक्क मंत्रालयात लाचखोरीचा प्रकार घडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आणि प्रशासकीय कारभारातील पादर्शतकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
काय म्हणाल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार?
लाचखोरी प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सोमवारी पार पडलेल्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) स्पष्ट शब्दांत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. “स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या,” अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांना केल्याचे सांगितले जात आहे.
अन्न आणि औषध खात्याच्या लिपिकाला एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. या घटनेनंतर नरहरी झिरवळ नॅाट रिचेबल होते. त्याअगोदर त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. चौकशीत जर या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते.
नेमकं काय म्हणाले होते नरहरी झिरवळ?
“या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि चौकशीत जर या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन,” अशी प्रतिक्रिया लाचखोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर नरहरी झिरवळ यांनी दिली होती.






