मोठी बातमी ! क्रीडा मंत्रालयाकडून नवीन कुस्ती संघटनेची मान्यता रद्द ; नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंगही निलंबित

WFI President Suspended : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) या नव्या संघटनेची मान्यता रद्द करत मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईमुळे कुस्ती महासंघावर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेत असताना WFI चे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांनाही निलंबित केले आहे. संजय सिंह हे भाजप खासदार आणि WFI चे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांनाही आता निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
नुकतीच संजय सिंग यांनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकली आणि ते अध्यक्ष होणार हे निश्चित झाल्यापासूनच कुस्तीप्रेमींनी यावर आक्षेप घेतला होता. कुस्तीपटूंनी सांगितले की, संजय सिंह हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे आहेत आणि अशा परिस्थितीत WFI मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होण्याची अपेक्षा नाही. मात्र, कुस्ती महासंघाची मान्यता आणि संजय सिंग यांना कोणत्या कारणासाठी निलंबित करण्यात आले, या दोन्ही गोष्टी वेगळ्या गोष्टी असल्याचे म्हटले आहे.
क्रीडा मंत्रालयाने आज कुस्ती महासंघ आणि त्याचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित केले. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, WFI ने विद्यमान नियम आणि नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. याबाबत मंत्रालयाकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. यात क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, “राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा घाईघाईने करण्यात आली आणि नियमांचे पालन केले गेले नाही”असे म्हटले गेले आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ही स्पर्धा आयोजित केली जाणार होती, जे ब्रिजभूषण सिंह यांचे क्षेत्र आहे.
मंत्रालयाने हे देखील सांगितले की, नवनिर्वाचित अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी 21 डिसेंबर रोजी जाहीर केले की कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस सुरू होतील. पण हे नियमाविरुद्ध आहे, कारण स्पर्धा सुरू होण्यासाठी किमान १५ दिवसांची नोटीस द्यावी लागेल, जेणेकरून कुस्तीपटू तयारी करू शकतील. मंत्रालयाने आरोप केला की, नवीन संस्था पूर्णपणे जुन्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचे दिसते, ज्यांच्यावर आधीच लैंगिक छळाचे आरोप आहेत.
प्रसिद्धीपत्रकात पुढे, ‘नवनिर्वाचित मंडळ क्रीडा संहितेचे पूर्ण दुर्लक्ष करून माजी पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येते असे म्हटले आहे. जुन्या अधिकाऱ्यांच्या आवारातून कुस्ती महासंघाचे कामकाज चालवले जात आहे. यामध्ये महिला कुस्तीपटूंविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार नोंदवण्यात आलेल्या परिसराचाही समावेश आहे. सध्या या प्रकरणाची न्यायालयातही सुनावणी सुरू आहे.




