Jishnu Dev Varma : तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात त्यांची नियुक्ती ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. तेलंगणाच्या राज्यपालपदी हिमाचल प्रदेशची जबाबदारी असलेल्या शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी ५ मार्च रोजी रात्री देशातील विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील राज्यपाल, नायब राज्यपालांची नियुक्ती जाहीर केली आहे. कोण आहेत जिष्णू देव वर्मा? ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून जिष्णू देव वर्मा ओळखले जातात. त्यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१८ ते २०२३ या कालावधीत ते या राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासा यांसारख्या खात्यांची जबाबदारी होती. तसेच जिष्णू देव वर्मा हे भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यांचा जन्म १५ अॅागस्ट १९५७ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९९० मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या सक्रीय राजकारणाला सुरुवात झाली. १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये त्यांनी त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्रिपुरा राज्यात डाव्या पक्षांचे वर्चस्व असताना जिष्णू देव वर्मा यांनी भाजपची संघटना मजबूत करण्याचे काम केले आहे. राजकारणाबरोबरच जिष्णू देव वर्मा कलाप्रेमी आहेत. त्यांना साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्राचीही आवड आहे. ते कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. याशिवाय ते बॅडमिंटन खेळाशीही जोडलेले असून क्रीडा संघटनांमध्ये त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. हेही वाचा : Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये ‘कचरा वॉर’! पोलिसांच्या एन्ट्रीनंतर तात्पुरता तोडगा, पण उद्याच्या बैठकीत काय होणार?