Governor Jishnu Dev Varma: जिष्णू देव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ
Governor Jishnu Dev Varma: शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आदी मान्यवर उपस्थित होते.

Governor Jishnu Dev Varma: जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातील राज्यपाल व उपराज्यपालांमध्ये केलेल्या मोठ्या प्रशासकीय फेरबदलानंतर वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.
शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल वर्मा सोमवारी आपल्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्यासमवेत मुंबईत दाखल झाले. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार व अन्य मान्यवरांनी केले.
#LIVE | ‘महाराष्ट्राचे नवनियुक्त मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी समारंभ’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
@maha_governor @Jishnu_Devvarma @Dev_Fadnavis#Maharashtra #Mumbai #OathCeremony https://t.co/8VFT5GMVEa
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 10, 2026
कोण आहेत जिष्णू देव वर्मा?
जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील एक अनुभवी राजकारणी असून त्रिपुराच्या राजघराण्याशी त्यांचा संबंध आहे. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते मानले जातात. १५ ऑगस्ट १९५७ रोजी अगरतळा, त्रिपुरा येथे जन्मलेल्या वर्मा यांनी १९९६, १९९८ आणि १९९९ या वर्षांत त्रिपुरा पूर्व मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी १९८९ ते १९९३ या काळात ईशान्य परिषद सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले.
१९९३ मध्ये ते INTACH च्या त्रिपुरा अध्यायाचे संयोजक आणि ईशान्य भारतासाठी समन्वयक होते. त्याच वर्षी ते भाजपमध्ये दाखल झाले व त्रिपुरातून राष्ट्रीय परिषद सदस्य म्हणून निवडले गेले. त्रिपुरा सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना वित्त, पंचायत, ग्रामविकास, ऊर्जा, विज्ञान व तंत्रज्ञान, नियोजन व समन्वय अशा अनेक खात्यांचे मंत्रिपद भूषवले.
हेही वाचा – मुद्रांक शुल्क प्रकरणे जलद निकाली काढण्यासाठी विधानसभेत दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर





