पुणेकरांसाठी मोठी बातमी ! गणेशोत्सवात ‘या’ दिवशी २४ तास धावणार मेट्रो; इतर दिवशी वेळ वाढवली, वेळापत्रक एकदा पाहा

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे.
तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवार ( दि.१७ ) सकाळी ६ ते बुधवारी ( दि. १८) सकाळी ६ असे २४ तास मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे.
मागील वर्षी महामेट्रोकडून गणेशोत्सवात तीन दिवस रात्री १२ पर्यंत सेवा सुरू ठेवली होती. त्यानंतर नागरिकांनी शेवटच्या दिवशी पूर्णवेळ सेवा सुरू ठेवण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन रस्त्यावरील इतर वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोची सेवा दररोज सकाळी सहा ते रात्री १० या वेळेत असते.
गणेशोत्सवातील वेळापत्रक
– ७ ते ९ सप्टेंबर : सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत.
– १० ते १६ सप्टेंबर : सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत.
– १७ सप्टेंबर सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत.
– १८ सप्टेंबर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत.





