मोठी बातमी..! शनी शिंगणापूर देवस्थानच्या उपकार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या

Nitin Shete : अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमधील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार आणि भाविकांच्या फसवणुकीच्या प्रकरणाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. बनावट ॲप, क्यूआर कोड आणि बोगस पावत्यांद्वारे भाविकांची लूट केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात झाला आहे.
या घोटाळ्याची चौकशी सुरू असताना आणि फौजदारी गुन्हा दाखल झालेला असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला.
या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, देवस्थानातील आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस कर्मचारी भरतीच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या दबावाशी याचा संबंध असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यासह देशात घराला दरवाजा नसलेले गांव म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानचा गैरकारभार काही दिवसांपुर्वी चव्हाट्यावर आलेला होता. भाविकांची बनावट अॅपव्दारे देणगी रुपात लुबाडणूक झाल्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थानचा गैरव्यवहार घोटाळा राज्यात गाजत असतांनाच देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी त्याच्या राहत्या घरी छतालाच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
शनिशिंगणापूर देवस्थान हे काही दिवसांपासून अर्थिक घोटाळ्यामुळे चांगलेच चर्चेत आलेले असतांना देवस्थानच्या गैरकारभाराबाबत काही शनिभक्त कार्यकर्त्यांनी राज्य सरकारकडे या गैरव्यवहाराचा पाठपुरावा केलेला होता. त्यानंतर या पावसाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये झालेल्या गैरव्यवहारला वाचा फोडणार असल्याचे मान्य करत याबाबत चौकशी समिती नेमलेली होती.
या चौकशी समितीने युद्ध पातळीवर गैरव्यवहार उलगडण्यासाठी चौकशीचा ससेमिरा सुरु केलेला असताना सोमवारी या देवस्थानचे वरिष्ठ अधिकारी नितीन शेटे यांनी आपल्या राहत्या घरी गळपास घेवून आत्महत्या केली. नितीन शेटे यांची आत्महत्या ही चौकशीच्या भीतीपोटी बळी? याबाबत शनिशिंगणापूर सह जिल्ह्यात चर्चेला चांगलेच उधाण आलेले आहे.
या देवस्थानामध्ये महिनाभरापूर्वी ११४ मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आलेले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना काढूनही टाकण्यात आलेले होते. त्यानंतर देवस्थानाचे बनावट अॅप तयार करून भाविकांच्या देणगी रुपातील पैशांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आलेला होता. या प्रकरणाची सध्या युद्ध पातळीवर चौकशी सुरु असल्यामुळे देवस्थान राज्यात चांगलेच चर्चेत आलेले होते. अशातच नितीन शेटे यांच्या गळफास घेवून केलेल्या आत्महत्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.





