मोठी बातमी.! जितेंद्र आव्हाड यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; मारहाण केल्याचा आरोप

मुंबई – ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब)सह आव्हाडांसह सात जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांचे पीए अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व इतर 3 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर तीन जणांनी आहेर यांच्यावर बंदूक आणि चॉपरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. आव्हाड यांच्यासह कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची माहिती देणारी ठाणे पालिकेतील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
या ऑडिओ क्लीपनंतर संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांच्यावर ठाणे पालिका मुख्यालयाच्या गेटवरच मारहाण केल्याचा घटना घडली. या घटनेमुळे सध्या एकच खळबळ निर्माण झाली आहे.





