पुणे जिल्हा | इंदापूर तालुक्यात जांभळाची मोठी आवक

लोणी देवकर, (वार्ताहर) – सध्या जांभळाचा हंगाम बहरात आला आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूसह विविध राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून जांभळांची आवक वाढली आहे. मात्र हवामान बदलाचा फटका जांभळांना बसला असून, यंदा जांभळांचा हंगाम १५ दिवस उशिराने सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
तूरट – गोड चवीच्या जांभळांना गेल्या काही वर्षांपासून मागणी वाढत आहे. मधुमेहावर जांभूळ गुणकारी मानले जात असल्याने मागणीत वाढ झाली आहे. सध्या बाजारात गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूतील जांभळांची आवक होत आहे.तसेच कोकण, पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातून जांभळांची आवक होत आहे, अशी माहिती जांभूळ विक्रेत्यांनी दिली.
दरवर्षी मे महिन्यात जांभळांचा हंगाम सुरू होतो. कडक ऊन, तसेच पूर्वमोसमी पावसामुळे यंदा जांभळांचा हंगाम उशिरा सुरू झाला. राज्य, तसेच परराज्यातून मिळून दररोज २० ते ३० टन जांभळांची आवक होत आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो जांभळांचे दर १०० ते १८० रुपयांपर्यंत आहेत.
किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार पाव किलो जांभळांची विक्री ८० ते १०० रुपये दराने केली जात आहे. जांभळांना मागणी चांगली आहे. गुजरातमधील जांभळांत गर जास्त असतो. गुजरातमधील जांभूळ गोड, आकाराने मोठे, तसेच आकर्षक दिसते. त्यामुळे गुजरातमधील जांभळांना मागणी जास्त असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
जांभळांना प्रक्रिया उद्याोगांकडून मागणी
जांभळांना मागणी चांगली असून, घरगुती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येत आहे. जांभळांना प्रक्रिया उद्याोगांकडून मागणी वाढली आहे. जांभळापासून सरबत, आइस्क्रीम तयार केले जाते. ऑगस्ट अखेरीपर्यंत जांभळांचा हंगाम सुरू राहणार असल्याचे जांभूळ विक्रेत्यांने सांगितले.





