Pune District : इंदापूर तालुक्यातील वाढीव गट-गण रचनेची चर्चा तापली!

नवीन राजकीय गणित, इच्छुक उमेदवारांची घालमेल ः तालुक्याचे लक्ष रचनेच्या प्रारूपावर
विजय शिंदे
वडापुरी – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे दालन खुले झाले आहे. यामुळे गेली सव्वातीन वर्षे प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया मार्गी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात एक नवीन जिल्हा परिषद गट आणि दोन नवीन पंचायत समिती गणांची भर पडणार असल्याने, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या बदलाच्या प्रक्रियेवर केंद्रीत झाले आहे.
राज्यात निवडणुकींची प्रक्रिया पुन्हा सुरू होत असताना गट व गण रचना ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जात आहे. याच प्रक्रियेवर भविष्यातील राजकीय वर्चस्व, संधी आणि आव्हानांचे गणित ठरणार आहे. प्रशासनाने 14 जुलैपर्यंत प्रारूप रचना प्रसिद्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर त्यानंतर 18 ऑगस्टपर्यंत अंतिम मंजुरी मिळवून प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या प्रारूपावर इच्छुक उमेदवार, राजकीय गट आणि सामान्य नागरिक हरकती, आक्षेप, सूचना देऊ शकतात. त्या तहसीलदार कार्यालयाकडून स्वीकारल्या जातील. नंतर जिल्हाधिकारी यावर अहवाल तयार करून विभागीय आयुक्तांकडे पाठवतील आणि अंतिम निर्णय आयुक्त सुनावणीद्वारे देतील.
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यात 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गण होते. या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे गट जिल्हा परिषदेवर प्रभावी होते, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांचा पंचायत समितीत वरचष्मा होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत नेमक्या कोणत्या भागात गट तयार होतात, कोणते भाग विभाजित होतात, यावर राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
नव्या संधी की जुनी घसरण?
गट-गण रचनेनंतर अनेक संभाव्य इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली होती. काहींनी मतदारसंघात सेवा केली, संपर्क वाढवला, कार्यकर्ते बांधले. मात्र, आता मतदारसंघ रचना बदलल्याने अनेकांचा कार्यक्षेत्र बदलण्याची भीती आहे. आपण केलेली सेवा वाया तर जाणार नाही ना? असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.
तालुक्याच्या राजकारणात हालचाल वाढली
वाढीव गट-गण रचनेनंतर इंदापूर तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा हालचाल सुरू झाली आहे. काही गावे व वाड्या नवीन गटांत जाणार असल्याने स्थानिक नेतृत्त्वाची भिती व संधी दोन्हीही आहे. नवीन गटाची जागा कुठे असेल? कोणत्या गावांचा समावेश होणार? कोणाचा वर्चस्व असलेला मतदारसंघ विभाजित होणार? या प्रश्नांवर सध्या राजकीय चर्चांचे वारे वाहत आहेत.
नजर टाकूया आगामी कालबद्ध टप्प्यांवर:
14 जुलै – प्रारूप गट/गण रचना प्रसिद्ध
8 जुलै-अगस्ट – आक्षेप, हरकती, सूचना स्वीकारणे
18 ऑगस्ट – अंतिम मंजुरी व अधिसूचना





