Big Breaking: व्लादीमीर पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल

पॅरिस : रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचे परिणाम आता जगावर उमटत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन त्यांच्या एका कृतीमुळे सध्या चर्चेत आले आहेत. पुतिन यांच्या पाठोपाठ त्यांचे कुटुंबही चर्चेत आले आहे. रशियामधील एका प्राध्यापकाने केलेल्या दाव्यानुसार पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबाला एका जमीनीखालील शहरामध्ये म्हणजेच अंडरग्राउण्ड सिटीमध्ये पाठवले आहे. हे शहर अण्वस्त्र हल्ल्यापासूनही सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे.
प्राध्यापकाने केलेल्या दाव्यानुसार पुतिन यांनी आपल्या कुटुंबियांना सायबेरियामधील एका गुप्त ठिकाणी हलवले आहे. या प्राध्यापकाने पुतिन यांच्याबद्दल इतरही काही धक्कादायक खुलासे केले आहे. यासंदर्भात एका इंग्रजी वर्तमानपत्राने केलेल्या वृत्तांकनात मॉस्को स्टेट इंस्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशनचे प्राध्यापक वालेरी सोलोवी यांच्या वक्तव्यांचा आधार घेतला आहे.
अहवालामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना अण्वस्त्र हल्ले होण्याची शंका वाटत आहे म्हणूनच अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी कुटुंबाला या ठिकाणी पाठवले आहे. प्राध्यापक सोलोवी यांनी अनेक धक्कादायक खुलासा केले. सोलोवी यांचा पुतिन यांच्या प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद होत असल्याने अनेक गुप्त गोष्टी त्यांना ठाऊक असल्याचे मानले जाते. सोलोवी यांच्याकडे रशियन नेत्यांच्या हलचालींबद्दल बरीच गुप्त माहिती असल्याचे सांगितले जाते. जमिनीखालील हे शहर सायबेरियामधील अल्ताई पर्वतांमध्ये असल्याचे सांगितले जाते. मात्र या अहवालामध्ये जागेचा थेट उल्लेख नाही आहे.
प्राध्यापकने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी आपल्या कुटुंबियांना उच्च तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आलेल्या बंकरमध्ये पाठवले आहे. हे बंकर सायबेरियामधील अल्ताई पर्वतांमध्ये आहे. या बंकरमध्ये सर्व सुखसोयी आणि अद्यावत तंत्रज्ञान आहे. अण्वस्त्र हल्ल्यांची परिस्थिती निर्माण झाली तर बंकरमधील व्यक्ती सुरक्षित राहतील यासाठी हा बंकर डिझाइन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सायबेरियामधील हा बंकर असणारा प्रांत मंगोलिया, काझिकस्तान आणि चीनच्या सीमांना लागून असल्याने अगदीच आपत्कालीन परिस्थितीमध्ये देशामधून पलायन करता येण्याच्या दृष्टीने योग्य असल्याचे सांगितले जात आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांनीच युक्रेनविरोधातील युद्ध टाळता येणार नाही असे म्हणत सात दिवसांपूर्वीच युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश आपल्या लष्कराला दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत युक्रेनमध्ये रशियन आणि युक्रेनियन लष्कर लढत आहे.





