Big Breaking: आमदार बच्चू कडू यांचा अपघात; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक

अमरावती: प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरात धडक दिल्याने बच्चू कडू यांचा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बच्चू कडू हे आज पहाटे 6 ते 6.30 च्या दरम्यान रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सुस्साट वेगात आलेल्या दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली. दुचाकीस्वाराने धडक दिल्याने बच्चू कडू हे रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला. डोक्याला मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून चिंतेचे काही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातात बच्चू कडू यांना मुक्कामार लागल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, दुचाकीस्वाराबाबतची काहीच माहिती मिळाली नाही. पोलीस सूत्रांनीही याबाबत काहीच माहिती दिली नाही.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या आधी आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. गोरे यांच्या कारला मध्यरात्री अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याही गाडीला अपघात झाला. आता बच्चू कडू यांचाही अपघात झाला आहे.





