नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का ! माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश

नांदेड – माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार यासंदर्भात विविध चर्चांना उधाणे आले होते.
मात्र, आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा निवडणूकीपूर्वी कॉंग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना सोबत घेवून भाजपने मोठी खेळी केली. मात्र, ही खेळी आता त्यांच्या अंगलट आल्याचे दिसून येत आहे.
कारण चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे मराठवाड आणि नांदेडमधील भाजपचे काही नेतेमंडळी नाराज होते. यात सूर्यकांता पाटील यांनीही लोकसभा निवडणूकीत तिकिट नाकारल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षाला रामराम केला होता.
महत्त्वाचे म्हणजे सूर्यकांता पाटील यांनी यापूर्वी अनेक वर्षे शरद पवार यांच्याबरोबर काम केले आहे. २०१४ पूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत्या. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, भाजपने सूर्यकांता पाटील यांना गेल्या १० वर्षात कोणतीही मोठी जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अशातच त्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.





