Congress : काॅंग्रेसच्या तरूण निष्ठावान नेत्याचं निधन; राहुल गांधींनी व्यक्त केला शोक
Congress :

Congress : बिहारमधील भागलपुर जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष प्रवीण सिंह कुशवाहा यांचा उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. दिल्लीहून कारने भागलपुरला परतत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत कुशवाहा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासह प्रवास करणारे पुतण्या, मेहुणी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२:३० च्या सुमारास कन्नौजमधील तालग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकाला धडकून पुलाच्या पिलरवर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच प्रवीण सिंह कुशवाहा यांनी प्राण सोडले.
महिनाभरापूर्वीच मिळाली होती जबाबदारी –
प्रवीण सिंह कुशवाहा यांची महिनाभरापूर्वीच भागलपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. एक निष्ठावान आणि जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती, मात्र नियतीने त्यांच्यावर काळाचा घाला घातला.
भागलपुर जिला कांग्रेस अध्यक्ष और वरिष्ठ कांग्रेस नेता प्रवीण सिंह कुशवाहा जी के सड़क दुर्घटना में हुए असामयिक निधन का समाचार अत्यंत दुखद है।
संगठन के प्रति उनकी निष्ठा और जनसेवा के प्रति उनका समर्पण सदैव स्मरणीय रहेगा।
शोक संतप्त परिजनों, मित्रों और समर्थकों के प्रति अपनी गहरी… pic.twitter.com/loTTJoNMZw
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 1, 2026
अपघाताच्या काही तास आधी शेवटची पोस्ट –
विशेष म्हणजे, अपघाताच्या अवघ्या सहा तास आधी कुशवाहा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी दिल्लीत हत्या झालेल्या पांडव कुमार या बिहारी युवकासाठी न्यायाची मागणी करत सरकारवर टीका केली होती. “हाच का डबल इंजिन सरकारचा न्याय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. ही त्यांची शेवटची सार्वजनिक प्रतिक्रिया ठरली.
राहुल गांधींनी व्यक्त केला शोक –
कुशवाहा यांच्या निधनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “प्रवीण सिंह कुशवाहा यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायक आहे. संघटनेप्रती त्यांची निष्ठा आणि जनसेवेचे समर्पण सदैव स्मरणात राहील. या कठीण प्रसंगी संपूर्ण पक्ष त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली.
तसेच बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश राम आणि प्रवक्ते असित नाथ तिवारी यांनीही या घटनेला पक्षाची मोठी हानी असल्याचे म्हटले आहे.
जखमींची प्रकृती चिंताजनक –
अपघातात जखमी झालेल्या कुमारी सपना (२३), विभु आर्यन (२०) आणि चालक विनोद मंडल (४०) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर लखनौ येथे हलवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





