Big Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; उभ्या कंटेनरला धडकली कार

सांगली – पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर वाळवा तालुक्यातील कासेगावजवळ शनिवारी दुपारी कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अरिंक्य आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे यांचा मृत्यू झाला. सर्व मृत हे जयसिंगपूर येथील आहेत. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीघांचा रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. कारने कंटनेरला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. याबाबत कासेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर थांबलेला होता. यावेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली. अपघातातील कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून गाडीचा वरील टप आणि दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते.
शिरोटे कुटुंबीय पिंपरी – चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले असताना वाळवा तालुक्यातील कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीतील सर्वांना बाहेर काढले. एकाच कुटुंबातील पाज जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





