satara | उड्डाणपुलासाठी उंब्रजला सर्वपक्षीय रास्ता रोको

उंब्रज, (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज, ता. कराड येथे उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. ठेकेदार दांडगाव्याने तारळी नदीवरील पूल पाडण्याची घाईगडबड करत आहे. उड्डाणपुलाची मागणी करणार्या स्थानिकांवर दबाव टाकला जात असल्याच्या निषेधार्थ उंब्रज येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, उंब्रज परिसरातील 30 गावांचे सरपंच व हजारो ग्रामस्थांनी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे कराड-सातारा लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, महामार्गाकडे येत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी काही वेळ रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला होता.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व अधिकार्यांशी आंदोलकांची चर्चा झाली. त्यानंतर काही वेळ महामार्ग रोखून धरण्यात आला. महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी व आंदोलकांची बैठक घडवून आणण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले. या प्रश्नावर दोन दिवसात बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
उंब्रज पंचक्रोशीतील 50 गावांमधील नागरिकांना महामार्गावर उंब्रज येथे जीवघेण्या अपघातांचा सामना गेल्या 20 वर्षांपासून करावा लागत आहे. वाहतूक कोंडी, प्रवाशांची गैरसोय, कमी उंचीच्या भराव पुलाखालील मार्गात अवजड वाहणे अडकून पडणे, सेवा रस्यांवर वाहतूक कोंडी, वळण घेण्याची गैरसोय, विद्यार्थांना करावी लागणारी कसरत अशा अनेक समस्या आहेत.
त्यामुळे उंब्रजला उड्डाणपूल व्हावा, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. सहापदरीकरणात उड्डाणपूल होण्याची अपेक्षा होती. त्यासाठी ग्रामपंचायतींसह ग्रामस्थांनी प्रशासनाकडे गार्हाणी मांडली. मात्र, तरीही उड्डाणपुलाबाबत कोणी चकार शब्द काढायला तयार नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
उंब्रजला उड्डाणपूल मंजूर होत नाही. त्यामुळे तारळी व उत्तर मांड नदीवरील जुने पूल पाडू नयेत, यासाठी ग्रामस्थांनी तारळी पुलाजवळचे काम यापूर्वी बंद पाडले होते. मात्र, मूळ मागणीला बगल देऊन, ठेकेदार कंपनीने दांडगाव्याने काम सुरू ठेवले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून ठेकेदार कंपनी ग्रामस्थांना भीती दाखवत आहे. याचा निषेध ग्रामस्थांनी आक्रमकपणे केला.





