वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांची लवकरच निवड केली जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेत उमेदवारीसाठी कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले होते. बायडेन यांचे वय आणि प्रकृती पाहता ते राजकारणातून आता निवृत्त होणार हे निश्चित. तथापि, बायडेन यांच्या संदर्भातील विविध बाबीही आता प्रकाशात येऊ लागल्या आहेत. त्यातली अशीच एक समोर आलेली माहिती म्हणजे आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात बायडेन यांनी ५३२ दिवस सुटी घेतली होती. विशेष म्हणजे या सर्व अधिकृत सुट्या होत्या. तसेच असेही म्हटले जाते आहे की एक सामान्य अमेरिकी नागरिक आपल्या ४८ वर्षांच्या सेवाकाळात जेवढ्या सुट्या घेतो तेवढ्या सुट्या बायडेन यांनी चारच वर्षांत घेतल्या आहेत. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार बायडेन यांना अध्यक्षपदाची धुरा स्वीकारून चार वर्ष पूर्ण झाली. दिवसांच्या भाषेत सांगायचे झाल्यास बायडेन १३२६ दिवस अमेरिकेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. मात्र यातील केवळ ७९४ दिवस त्यांनी काम केले असून ५३२ दिवस सुट्या घेतल्या आहेत. याचाच अर्थ आपल्या कारकीर्दीतील जवळपास ४० टक्के वेळ हा त्यांनी सुट्यांमध्ये घालवला आहे.