NATO summit in Lithuania : ‘नाटो’च्या बैठकीपूर्वी बायडेन 3 देशांच्या दौऱ्यावर

वॉशिंग्टन – “नाटो’ सदस्य देशांच्या परिषदेच्या मिनित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन 3 देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. युक्रेनला “नाटो’मध्ये सहभागी करून घेतले जाण्याच्या शक्यतेमुळे तणाव निर्माण व्हायला लागला आहे. युक्रेनबाबतच्या प्रस्तावाला पाठिंबा मिळवण्यासाठी बायडेन प्रयत्न करणार आहेत.
दौऱ्याच्या सुरुवातीला ते ब्रिटनमध्ये गेले असून त्यांनी तेथे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची भेट घेतली. यावेळी वातावरणासमोरील आव्हाने आणि “नाटो’तील युक्रेनच्या प्रवेशाबाबत चर्चा झाली.
लिथुआनियाच्या राजधानीमध्ये मंगळवार आणि बुधवारी “नाटो’ सदस्य देशांची परिषद होणार आहे. “नाटो’मध्ये स्वीडन सहभागी होण्याला तुर्कीयेने घेतलेला आक्षेप मागे घ्यावा, यासाठी बायडेन या परिषदेत तुर्कीयेवर दबाव आणण्याची शक्यता आहे. मात्र युक्रेनला तात्काळ “नाटो’चे सदस्यत्व बहाल करण्याला बायडेन यांचा विरोध असणार आहे. “नाटो’चे सदस्यत्व मिळण्याबाबत सर्व 31 देशांची सहमती मिळणे आवश्यक आहे.
लिथुआनियातील “नाटो’ परिषद संपवल्यानंतर बायडेन फिनलंडला जाणार आहेत. तेथे ते अमेरिका आणि नॉर्डिक नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.





