अदानींच्या चौकशीला अमेरिकन कॉंग्रेस खासदाराचे आव्हान

वॉशिंग्टन – अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्यांच्या क्रियाकलापांची चौकशी करण्याच्या बायडेन प्रशासनाच्या निर्णयाला एका रिपब्लिकन खासदाराने आव्हान दिले आहे. अशा निवडक कृतींमुळे आघाडीतील महत्त्वाच्या भागीदारांचे नुकसान होण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हाऊस ज्युडिशियरीचे सदस्य असलेल्या काँग्रेसचे सदस्य लान्स गुडन यांनी अमेरिकेचे ऍटर्नी जनरल मेरिक बी गारलँड यांना कठोर शब्दांत पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी न्याय विभागाकडून परदेशी संस्थांविरुद्ध निवडक खटला चालविण्याबाबत उत्तरे मागितली आहेत. अशा कृतींमुळे अमेरिकेच्या जागतिक आघाड्यांवर आणि आर्थिक विकासाला नुकसान होऊ शकते. तसेच जॉर्ज सोरोसशी त्याचा काही संबंध आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
गुडन यांनी 7 जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, न्याय विभागाच्या निवडक कृतींमुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेच्या सर्वात मजबूत मित्रांपैकी एक असलेल्या भारतासारख्या महत्त्वाच्या भागीदारांना नुकसान होण्याची भीती आहे.
कमकुवत अधिकारक्षेत्रे आणि अमेरिकेच्या हितसंबंधांशी फारसा संबंध नसलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्याऐवजी न्याय विभागाने देशांतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि दोषींना शिक्षा करणे आवश्यक आहे. अमेरिकेत कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या आणि हजारो नोकऱ्या निर्माण करणाऱ्या अशा कंपन्यांना लक्ष केल्याने अमेरिकेचे दीर्घकालीन नुकसान होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
अडथळे निर्माण करण्याचा उद्देश –
गुडन म्हणाले की, हे निर्णय अशा वेळी घेतले जात आहेत जेव्हा बायडेन प्रशासनाचा काळ संपत आला आहे. यावरून हे स्पष्टपणे दर्शवते की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अडथळे निर्माण करणे हा त्यांचा एकमेव हेतू आहे. हजारो मैल दूर असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित खटल्यावर खर्च करण्याऐवजी अमेरिकन नागरिकांना अधिक चांगला सेवा देण्यासाठी प्रशासनाशी सहकार्य केले पाहिजे. अमेरिकेच्या भू-राजकीय श्रेष्ठतेशी तडजोड करू शकतील अशा आणखी गुंतागुंत निर्माण करू नयेत. यामुळे परदेशी संस्थांविरूद्धच्या प्रकरणांमध्ये अमेरिकेच्या जागतिक आघाडीवर कधीही भरून न येणारा दबाव पडू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.





