Bibwewadi Gas Leak – गंगाधाम परिसरात मध्यरात्री झालेल्या क्लोरीन गॅस गळतीच्या गंभीर घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत तब्बल २६ जणांना श्वासोच्छ्वासाचा त्रास झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत एकूण ८ महिला, ८ पुरुष आणि ६ लहान मुलांना त्रास झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत जागेचे मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फिर्यादी आश्फाक रशीद सय्यद (३३, रा. कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रकाश बाबुलाल मुथ्था (७६, रा. सॅलेसबरी पार्क) आणि त्यांचा व्यवस्थापक साहील हमीद मुलाणी (२८, रा. अप्पर बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास गंगाधाम रोडवरील वर्धमान लॉन्ससमोर, आई माता मंदिराजवळील मोकळ्या जागेत ठेवलेल्या क्लोरीन सिलिंडरमधून गळती झाली. संबंधित सिलिंडर योग्य सुरक्षाव्यवस्था न ठेवता निष्काळजीपणे उघड्यावर ठेवल्याने विषारी वायू हवेत पसरला. गंगाधाम चौक : क्लोरीन सिलेंडरच्या वायु गळतीने त्याभागात बॅरीकेट लाउन बंद करण्यात आला. गॅसचा तीव्र वास येऊ लागल्याने परिसरातील नागरिक बाहेर पडले आणि शोध घेतला असता, गॅस टाकी लिकेज झाल्याचे आढळले. घटनास्थळी काम करणाऱ्या कामगारांनाही श्वास घेण्यास त्रास होत होता. या घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ डायल ११२, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सेवांना संपर्क साधला. त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बाधित नागरिकांना तातडीने ससून सर्वोपचार रुग्णालय आणि भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल माने यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल माने करीत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.