वर्षा पर्यटनाचा आनंद वाढविणारा भुट्टा! स्थानिकांना रोजगार देणारा, पर्यटकांची भूक भागविणारा ‘भुट्टा’ अर्थात ‘मक्याचं कणीस’

कामशेत : पावसाळा सुरू झाला की मावळ तालुका हा देशभरातील पर्यटकांसाठी आनंदवन ठरतो. हिरवेगार डोंगर, उंचावरुन कोसळणारे धबधबे आणि स्वर्गासमान भासणारे अनेक पाइंट्स हे पर्यटकांना आकर्षित करतात. मावळात आल्यावर पावसाळी पर्यटनाचा अनुभव घेतला की त्या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतात. यासोबत मावळातील अतिरम्य वातावरणात गरमा-गरम भुट्ट्याची चाखलेली चवही कायम जिभेवर रेंगाळत राहते. हीच चव पुन्हा मावळात जाण्याची आतुरता वाढविते.
पावसाळा सुरू होऊन काही दिवस लोटले असून मावळातील निसर्ग आता चांगलाच फुलला आहे. अशात पावसाळी पर्यटनासाठी मावळात पर्यटक दाखल होऊ लागले आहे. यासोबतच पर्यटकांची भूक भागविणारा आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देणारा भुट्टा देखील बाजारात दाखल झाला आहे. तिखट-मीठ व लिंबू लावलेल्या मक्याच्या कणीस अर्थात भुट्टा हे मावळातील नव्हे वर्षा पर्यटनाचे जणू अविभाज्य समीकरण बनले आहे.
पावसाळ्यात मावळमध्ये आल्यावर जागोजागी मक्याचे स्टॉल लावलेले दिसतात. कारण या हंगामात चटपटीत चवीचा, कोळश्यावर खरपूस भाजलेला आणि छान लिंबू लावलेला भुट्टा खाण्यासाठी अनेकांचे मन चाळवते. थंडगार वातावरणात मक्याचे दाणे चघळण्याची मज्जा काही औरच असते. पावसाळ्यात जिभेचे चोचले पुरवणारा हा भुट्टा चवीला जितका चटपटीत, अगदी तितकाच आरोग्यासाठीही तो खूप फायदेशीर मानला जातो. पावसाळ्यात मक्याचे दाणे खाल्ल्याने अनेक समस्या आणि हंगामी आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येऊ शकते.
पावसाळ्यात भुट्टा खाण्याचे फायदे :
पावसाळ्यात भुट्टा खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे काही विशिष्ट आजारांचा धोका कमी होतो, असे तज्ज्ञ मानतात. मका एक बहुमुखी आणि पौष्टिक धान्य आहे, जे आवश्यक पोषक आणि आहारातील फायबर प्रदान करते. पावसाळ्यात मक्याचे कणीस खाल्ल्याने जीवनसत्त्वे समृद्ध होतात, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, पाचक क्रिया सुधारते, हृदय मजबुत बनते, मधुमेह व्यवस्थापनास मदत मिळते, वजन नियंत्रणात राहते, हाडे मजबूत आणि निरोगी राहतात, त्वचा निरोगी राहते, असे अनेक फायदे होतात.





