Bhushan Gavai | सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? हा सवाल अनेक दिवसांपासून केला जात होता. अखेर त्याला आता पूर्णविराम लागला आहे. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पुढील महिन्यात १४ मे रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या भूषण गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. विशेष म्हणजे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या कुटुंबाला आंबडेकरी चळवळीचा आणि राजकीय वारसा लाभलेला आहे. भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण गवई आंबेडकर चळवळीतील सक्रिय नेते होते. राज्यसभेचे खासदार तसेच केरळ आणि बिहारचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे भूषण गवई हे तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश राहिले आहेत. चला तर मग ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात… भूषण गवई यांची कारकीर्द भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. नागपूर विद्यापीठातून कला आणि कायद्याची पदवी घेतली. न्यायमूर्ती गवई १६ मार्च १९८५ रोजी बारमध्ये सामील झाले होते. १९८७ ते १९९० पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिलीस सुरुवात केली. Bhushan Gavai | – ते नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी कौन्सिल होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून काम केले. – ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ या काळात त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून कामगिरी बजावली होती. – १७ जानेवारी २००० रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. – १४ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. – १२ नोव्हेंबर २००५ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. २०१९ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयासाठी शिफारस करण्यात आली होती. न्यायाधीश म्हणून त्यांनी २४ मे २०१९ रोजी शपथ घेतली. त्यावेळेस त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले. आता त्यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ १४ मे पासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. Bhushan Gavai | हेही वाचा: बिग बॅास विजेता सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी