बिग बॅास विजेता सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी

Baramati | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आले आहेत. बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे पाण्याचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बारामतीत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी त्यांनी केली. प्रलंबित कामांविषयी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर बिग बॅास मराठी विजेता सूरज चव्हाण याच्या नव्या घराच्या बांधकामाची पाहणी देखील अजित पवारांनी केली.
बारामतीचा सुपुत्र मराठी बिग बॅास विजेता सुरज चव्हाण याच्या नवीन घराच्या बांधकामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत. सूरजने बिग बॅासची ट्रॅाफी जिंकल्यानंतर महाराष्ट्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
सूरजने अजित पवारांची भेट घेतली. पवार यांनी त्याला घर बांधून देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित घराच्या काम करणाऱ्यांनी सूरज राहत असलेल्या जागेची पाहणी करुन काम करण्यास सुरुवात केली. यानंतर आता खुद्द अजित पवार यांनी सूरजच्या नव्या घराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आहे.
सूरजचा झापूक झूपक चित्रपट
सूरज चव्हाण हा बिग बॅास मराठीच्या माध्यमातून घराघरात पोहचला. बिग बॅास विजेता झाल्यानंतर तर त्याची एक वेगळी ओळख तयार झाली. मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत नावाजलेले दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजसोबत एक चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव झापूक झपूक असून, त्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज करण्यात येणार आहे.





