Bhosari Traffic: कोट्यवधींचा पूल बांधून फायदा काय? राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी कायम
Bhosari Traffic: दोन दशकांपूर्वी उभारलेल्या राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील दुरवस्था; बेशिस्त रिक्षा, हातगाड्या आणि अतिक्रमामांमुळे रस्ता झाला अरुंद.

Bhosari Traffic – वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सुमारे दोन दशकांपूर्वी उभारण्यात आलेला राजमाता जिजाऊ उड्डाणपूल भोसरीतील वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा देत असला, तरी पुलाखालील परिसरातील नियोजनाअभावी नागरिकांच्या अडचणी कायम आहेत. बेशिस्त पार्किंग, रिक्षा, हातगाड्या, अतिक्रमण, फुटपाथची दुरवस्था तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या अभावामुळे हा परिसर दिवसेंदिवस बकाल होत आहे.
भोसरीहून नाशिक, आळंदी, दिघी आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची या परिसरात मोठी वर्दळ असते. मात्र, पुलाखाली रिक्षा, हातगाड्या, दुचाकी तसेच चारचाकी वाहने बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने रस्ता अरुंद होतो. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होते. नियोजित वाहनतळ नसल्याने ‘जागा मिळेल तिथे वाहन’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात
पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेले फुटपाथ हातगाड्या, व्यावसायिक साहित्य आणि अन्य अतिक्रमणांनी व्यापले आहेत. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. वाहनांच्या वर्दळीतून पादचाऱ्यांना मार्ग काढावा लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
नियोजनाचा अभाव
उड्डाणपूल सुरू झाल्यापासून पूरक रस्ते, पार्किंग, फुटपाथ, सार्वजनिक सुविधा आणि अतिक्रमण नियंत्रणाचे नियोजन अपेक्षित होते. मात्र, या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने कोट्यवधींच्या उड्डाणपुलानंतरही भोसरीचा वाहतूक प्रश्न कायम आहे. महापालिका, वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून अतिक्रमण हटविणे, फुटपाथ मोकळे करणे, रिक्षा हातगाड्यांसाठी शिस्तबद्ध व्यवस्था नियोजित पार्किंग, स्वच्छतागृह आणि वाहतूक नियंत्रण यांचा तातडीने आराखडा राबवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.




