Bhor News : रक्षाबंधनासाठी भोरची बाजारपेठ सजली
Bhor News : दुकानांमध्ये १० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध असून, खरेदीसाठी महिला व तरुणींची मोठी गर्दी दिसून येत आहे.

महुडे : बहीण-भावाच्या अतूट नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन अवघ्या दोन दिवसांवर (शुक्रवारी, दि. २८) येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर भोर शहर व ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठा विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांनी सजल्या आहेत. दुकानांमध्ये १० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध असून, खरेदीसाठी महिला व तरुणींची मोठी गर्दी दिसून येत आहे.
यंदा बाजारपेठेत विविध रंग, आकार आणि डिझाइनच्या फॅन्सी राख्या दाखल झाल्या आहेत. विशेषतः लहान मुलांसाठी कार्टून, गाड्या, लाईट आणि म्युझिक असलेल्या राख्यांना अधिक मागणी आहे.
कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ, मजुरी आणि इंधन दरवाढीमुळे यंदा राख्यांचे दर वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. गतवर्षी १० ते २० रुपयांना मिळणारी साधी राखी यंदा २५ ते ३० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर १०० रुपयांची डिझायनर राखी यंदा १३० ते १५० रुपयांना विकली जात आहे.
महागाई वाढली असली तरी भावावरील प्रेमाचा आणि सणाचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. “राखी ही बहीण-भावाच्या पवित्र भावनेचे प्रतीक आहे. किमती कितीही वाढल्या तरी भावासाठी राखी घ्यावीच लागते, मात्र यंदा दर काहीसे जास्त वाटत आहेत,” अशी प्रतिक्रिया सारिका केशव पवळे या ग्राहक महिलेने दिली.
राख्यांसाठी लागणारा कच्चा माल, रेशमी धागे, पॅकिंग साहित्य, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे या वर्षी राख्यांच्या दरात वाढ झाली आहे. तरीही ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता, काही प्रमाणात दरात तडजोड करून आम्ही राख्यांची विक्री करत आहोत.
-प्रसन्न गुजर, राखी विक्रेते, भोर.





