प्रभात वृत्तसेवा भोर – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका २ डिसेंबरला होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यामुळे अवधी कमी असल्याने भोरमध्ये इच्छुक नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. भोरमध्ये नगराध्यक्ष कोण होणार ? याकडे संपूर्ण भोर तालुक्याचे लक्ष लागले आहे. भोरच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवाराची सर्वच महत्त्वाच्या राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरू आहे. भोरमध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी रामचंद्र आवारे, संजय जगताप, यशवंत डाळ, गणेश पवार, विठ्ठल शिंदे, नितीन सोनवले, कविता खोपडे, संदीप शेटे हे इच्छुक उमेदवार आहेत. अशी असणार नगरपरिषदेची समिती.. भोर नगरपरिषदेत गेल्या पंचवार्षिकला १७ नगरसेवक होते तर १ नगराध्यक्ष, अशी एकूण १८ पदाधिकाऱ्यांची कमिटी होती. या पंचवार्षिकला प्रभाग रचनेत बदल होऊन २० नगरसेवक व १ नगराध्यक्ष, अशी २१ पदाधिकाऱ्यांची कमिटी असणार आहे. मंगळवारी (दि.४) नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने भोर शहरात इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली असून भोर शहरात राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गटातील उमेदवार सज्ज झाले असून विशेष लढत भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गटात होणार असल्याची चर्चा होत आहे.