Bhor News: शिक्षणासाठी जीव मुठीत धरून प्रवास! बससेवा बंद पडल्याने विद्यार्थ्यांची जंगलातून पायपीट
Bhor News: घनदाट जंगल, दाट धुकं अन् मुसळधार पावसात दररोज ६ किमी पायपीट; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त.

Bhor News – भोर तालुक्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून काही रस्ते तुटले आहेत, तर पुलांचे कठडे कोसळल्याने वाहतूक मंदावली आहे. हिरडस मावळ खोऱ्यातील कुडली खुर्द (ता. भोर) नजीकच्या पुलाचा कठडा तुटून पूल खचल्यामुळे पुढील गावांची एसटी बससेवा ठप्प झाली आहे.
परिणामी, शिरवली येथील शाळेत ये-जा करण्यासाठी दररोज सुमारे २५ ते ३० विद्यार्थ्यांना ६ किलोमीटरची पायपीट करावी लागत असून त्यांची मोठी ससेहोलपट होत आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. मागील १५ दिवसांपासून हिरडस मावळातील एसटी बस केवळ शिरवली गावापर्यंतच जात आहे.
पुढील धनगरवाडा, कुडली बुद्रुक, कुडली खुर्द आणि दुर्गाडी या अतिदुर्गम गावांपर्यंत बस जात नसल्याने दळणवळणाची सोय पूर्णपणे खंडित झाली आहे. या चार गावांमधील २५ हून अधिक मुले-मुली शिरवली येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी जातात. दळणवळणाचे साधन नसल्याने या चिमुकल्यांना दररोज पायी प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा दाट जंगल असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून जावे लागते.
सध्या या डोंगरी भागात जोरदार पावसासह दाट धुके असल्याने समोरील रस्ता दिसणेही कठीण होते, अशी माहिती सरपंच नामदेव पोळ यांच्यासह विद्यार्थिनी मीनाक्षी पोळ, साक्षी पोळ व कल्याणी पोळ यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि भोर एसटी आगाराने दुर्गाडीपर्यंत बस पुन्हा सुरू करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी केली आहे.
“सध्या दुर्गाडी परिसरात पावसाचे प्रमाण जास्त आहे. पुढील २ ते ४ दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तत्काळ खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केली जाईल.”
– विशाल गुजर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.





