भाटघर – गेल्या सात महिन्यांपासून भोर-कापूरहोळ रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले होते. यावर तात्पुरता उपाय करण्यासाठी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये दोनवेळा मुरुमाने खड्डे भरले होते. यावर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खड्यांतील मुरूम वाहून गेल्यामुळे खड्डे उघडे पडल्याने याचा त्रास वाहनचालकांना होत होता. याची दखल बांधकाम विभागाने घेतली असून, जलद गतीने खडी आणि डांबराने खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याने वाहक आणि प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत. भोर तालुक्यात भोर-कापूरहोळ हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. पुण्याकडे जाण्या-येण्यासाठी या रस्त्याचा अवलंब केला जातो. दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर संबंधित विभागाकडून रस्त्यावरील खड्डे खडी आणि डांबराने भरले जातात; परंतु थोड्याच कालावधीनंतर परत खड्डे उघडे पडतात. त्यामुळे गुणवत्ताहीन काम केले जात असल्याची चर्चा परिसरातील नागरिक करीत आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहनचालकांना मणक्याचे विकार होत आहेत. रस्ता खराब असल्यामुळे नोकरीनिमित्त पुण्याला जाणाऱ्या तरुणांना दररोज उशीर होत आहे. भोर तालुक्यात निसर्गमय वातावरण असून, किल्ले, राजवाडा, दोन धरणे अशी विविध पर्यटनस्थळे आहेत; परंतु रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे तालुक्यात पर्यटक येण्यास टाळाटाळ करीत आहेत. याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. याची दखल बांधकाम विभागाने घेतली असून, खड्डयांच्या संकटापासून मुक्तता मिळवण्यासाठी जलद गतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आम्हाला दररोज नोकरीनिमित्त पुण्याला ये-जा करावी लागत आहे. भोर-कापूरहोळ या चौदा किलोमीटरच्या अंतरात रस्त्यावर भरपूर खड्डे असल्याने प्रवास करण्यास जास्त वेळ लागत होता; परंतु आता खड्डे बुजवल्याने वेळेची बचत होणार आहे. – मच्छिंद्र चोरगे, प्रवासी, भेलके आळी, भोर.