Bhor Forest Fire : भोरचे डोंगर काळेकुट्ट! वणव्याच्या आगीत वन्यप्राण्यांचा कोळसा; निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त
Bhor Forest Fire : भोर तालुक्यातील डोंगरांमध्ये वणव्याचे थैमान; हजारो झाडेझुडपे आणि वन्यप्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी, पर्यावरणाची मोठी हानी.

Bhor Forest Fire – भोर तालुक्यात यावर्षी अनेक डोंगरांमध्ये वणव्याने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे डोंगरातील झाडेझुडपे जळाली असून वणव्याच्या आगीत वन्यप्राणी व इतर पशुपक्षी जळून भस्मसात झाली आहेत. वणव्यामुळे तालुक्यात जनावरांचा चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. भविष्यात वणव्याने रौद्ररूप धारण करू नये यासाठी वन विभाग दक्षता घेण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.
भोर तालुक्यात यावर्षी बहुतांश डोंगरांना वणवा लागल्याने तालुक्यातील डोंगर काळेकुट्ट झालेले दिसून येत आहे. वणवा लागल्याने झाडेझुडपे जळून खाक झाले आहेत. एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा या तत्त्वाचा अवलंब करीत आहे. मात्र, दुसरीकडे डोंगरांमध्ये वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने डोंगर पूर्णपणे जळाल्याचे चित्र निर्माण होत आहे. वणव्यामुळे झालेले नुकसान अधिक काळ भरून न येणारे असल्याचे जाणकारांकडून म्हटले जात आहे.
भोर तालुका डोंगरदर्यांनी व्यापला असून तालुक्यात यावर्षी अनेक डोंगर आगीत भस्मसात झाले आहेत. अचानक वणवा लागल्याने डोंगरात वास्तव्यास असणारे ससे, हरिण, कोल्हे यासारखे इतर वन्यप्राणी तसेच सरपटणारे प्राणी जळून खाक होत आहेत. डोंगरांमध्ये वृक्षांवर अनेक पक्षांनी घरटे निर्माण केले असून वृक्षांवर त्यांनी पिल्लांसहित संसार थाटला आहे परंतु अचानक वनवा लागल्याने पिल्लांसहित पक्षी भस्मसात होत आहेत.
भोर तालुका नैसर्गिक संपदेने नटलेला आहे. या तालुक्यात डोंगराचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या काळी डोंगर दाट वृक्षांनी हिरवागार असलेला दिसून येत होता. परंतु वृक्षतोडीमुळे सद्यस्थितीला डोंगरातील वृक्षांचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे. अशा स्थितीत वनवा लागल्याने उरली सुरलीही वृक्ष जळून नष्ट होत आहेत. या डोंगरांमध्ये अनेक औषधी वनस्पती असली तरी वणवाच्या आगीत ही औषधी वनस्पती नष्ट होत आहेत.
तालुक्यातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हैस यासारखी दूध उत्पादन देणारी जनावरे पाळत आहेत. या जनावरांना खाद्य म्हणून ज्वारीचा कडबा व डोंगरातील गवताचा उपयोग होतो. परंतु यावर्षी तालुक्यात बोगस बियाणामुळे ज्वारीचे पीक दोन ते तीन फुटच उगवले असल्याने शेतकऱ्याला ज्वारीचे पीक तर मिळालेच नाही. तर जनावरांसाठी कडबा सुद्धा मिळाला नाही.
यामुळे जनावरांच्या खाद्यासाठी फक्त डोंगरातील चारा हा आशेचा किरण उरला होता. परंतु वणव्यात चारा भस्मसात झाल्याने जनावरांच्या खाद्याचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. जनावरांना खाद्य उपलब्ध नसल्याने जनावरे विकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय उरला नाही जनावरांची विक्री केल्यास शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
“आमच्या कार्यक्षेत्रामधील सर्व डोंगरांमध्ये जाळ रेषा काढल्या असून नागरिक जाणून बुजून रात्रीच्या वेळी आग लावीत आहेत. अचानक लागलेला वणवा विझवण्याचे काम वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.”
– वसंत चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी, नसरापूर (ता.भोर)






