Bhor Crime: भोरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री ५ फ्लॅट्सवर दरोडा; लाखांचा मुद्देमाल लंपास
Bhor Crime: बळकट लोखंडी दरवाजे तोडल्याने रहिवाशांत कमालीची घबराट; शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची भोरकरांची मागणी.

Bhor Crime – भोर शहरातील ‘स्वप्नलोकनगरी’ सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल पाच बंद फ्लॅट्सची कुलूपे व सेफ्टी दरवाजे तोडून धुमाकूळ घातला. यापैकी तीन फ्लॅट्समधून चोरट्यांनी ६ लाख ३९ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली, तर दोन फ्लॅट्समध्ये हाती काहीच न लागल्याने चोरट्यांनी तोडफोड केली.
ही घटना शुक्रवारी (दि. ३१ जुलै) रात्री घडली असून, याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविराज अशोक मालुसरे (रा. स्वप्नलोकनगरी, भोर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी स्वप्नलोकनगरीतील वेगवेगळ्या इमारतींमधील पाच बंद फ्लॅट्सच्या मुख्य दरवाजांचे आणि लोखंडी सेफ्टी दरवाजांचे कोयंडे कटर अथवा अवजारांच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला.
यात गणेश सुदाम खोपडे, लोकेश दशरथ भगत, अभिजित शामराव फरगडे, श्रीमंत सुभाष बोडके आणि अविराज अशोक मालुसरे या ५ जणांचे फ्लॅट्स चोरट्यांनी लक्ष्य केले होते. यातील अविराज मालुसरे, गणेश खोपडे आणि श्रीमंत बोडके यांच्या तीन फ्लॅट्समधून ६ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. उर्वरित दोन फ्लॅट्समध्ये काहीही न मिळाल्याने चोरट्यांनी वस्तूंची तोडफोड केली.
बळकट लोखंडी सेफ्टी दरवाजे बसवलेले असतानाही ते तोडून चोरट्यांनी चोरी केल्यामुळे रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाळ्यात घडलेल्या या मोठ्या घरफोडीमुळे भोर शहरात रात्रीची पोलीस गस्त तत्काळ वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीला खोत आणि पोलीस हवालदार धर्मराज खांडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





