भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी निर्माण झालेला विषय – जितेंद्र आव्हाड

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य झालाच पाहीजे. समाज व धर्म कोणताही असो सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वांना ऐकावेच लागतील. भोंगा हा विषय फक्त दंगल माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे. भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळत आहे. त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देण्याचे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
नोकऱ्या किती गेल्या, याचे मोजमाप आहे का? तर काहीच नाही. महागाई किती वाढली याबद्दल कुणी बोलतंय का? तर नाही. पेट्रोलचे दर 125 रुपयांवर गेले आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. 2014 रोजी पेट्रोलचा दर 71 रुपये होता. त्यावेळी 410 रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आज हजाराच्यावर गेला आहे. पेट्रोल-डिझेल-सीएनजी महाग झाल्यामुळे दळणवळण महाग होतं, त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्याच्या किंमती वाढतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आज सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना निदर्शनास आले की, भारतात केवळ आठ दिवस पुरेल इतकाच कोळश्याचा साठा आहे. हे काय दर्शविते? आज जर आपण कोळसा व्यवस्थित जमवला नाही तर हा देश कमीत कमी 14 तास अंधारात राहील. श्रीलंकेची महागाई आणि आपल्या महागाईत केवळ 17 टक्क्यांचा फरक आहे. या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर पुढच्या काळात आपली श्रीलंका होणार नाही, याची काळजी सर्व पक्षांनी, धर्मांनी, माणसांनी घेतली पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या महागाईबाबत बोलताना संतापजनक प्रतिक्रिया दिली. याचाही समाचार मा. जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. हे लोक बेफिकिरी दाखवतात, याचे कारण जर आपण धर्माचा द्वेष पसरवला तर आपण काहीही करु शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. 2014 साली 71 रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल आज सव्वाशे रुपयांवर आलेले असताना अर्थमंत्री बोलणार नसतील तर आपण काय बोलणार?, असा सवाल त्यांनी केला.
आता लोकांनीच समजून घ्यायला हवे. उद्या सामान्य लोकांची मुलं घराबाहेर जाणार आहेत. धर्म कोणताही असो पण दगडाला दगड लागून त्यातून अग्नी निर्माण होतो. त्या अग्नीत कोणत्याही नेत्याचं मुल जळणार नाहीत, पण तुरुंगात मात्र सामान्य माणसांची मुलं खितपत पडतील. या देशातील तरुणांना दंगलीच्या वाटेवर नेऊन सामान्य माणसांना देशोधडीला लावायचे हा प्रकार मला तरी अमान्य आहेत, अशी स्पष्टोक्ती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.





