Pune : पुणे पुस्तक महोत्सवातील गिनीज विक्रमात “लोकमान्य’चा सहभाग

पुणे : वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यास (नॅशनल बुक ट्रस्ट) पुणे महापालिका, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आणि इतर शासकीय, अशासकीय संस्थांच्या मदतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाने चार जागतिक विक्रम नोंदवले आहेत.
फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला पुस्तकांचा वापर करून सरस्वती देवीची कलाकृती तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. या विश्वविक्रमासाठी ४ हजार १८९ पुस्तकांचा वापर करण्यात आला. नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तकांनी तयार करण्यात आलेली ही कलाकृती एक हजार चौरस मीटरमध्ये साकारण्यात आली. या जागतिक विक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी सहभागी झाली होती.
विश्वविक्रमासाठीची कलाकृती किमान एक हजार चौरस मीटरची असणे, सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचा वापर, जागा रिकामी न राहणे, पाच वेगवेगळे रंग असणे अशा विविध निकषांवर या कलाकृतीचे मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार साकारलेली कलाकृती पात्र ठरवून गिनीज विश्वविक्रम नोंदवला गेला.
या पुणे पुस्तक महोत्सवाने पुणेकर साहित्य-रसिकांचा मनात एक वेगळे स्थान मिळवले आहे. महोत्सवाला पुणेकरांना अविस्मरणीय प्रतिसाद दिला. अशा आगळ्यावेगळ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या आयोजनात या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लोकमान्य सोसायटीला सहभागी होता आले आहे. याचा आम्हाला आनंद आहे.
– किरण ठाकूर, संस्थापक-अध्यक्ष, लोकमान्य सोसायटी.
या विक्रमाच्या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चित्रा वाघ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकूर, लोकमान्य सोसायटीचे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव, उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्यासह महोत्सव संयोजन समितीतील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.





