Bhimashankar Temple: भाविकांना मोठा दिलासा! भीमाशंकरला ‘या’ वेळेत मिळणार थेट दर्शन; ऑनलाईन नोंदणीची कटकट संपली
Bhimashankar Temple: १५ जूनपासून दर्शन खुले झाल्यानंतर पास अनिवार्य केल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप होता; गुरुवार १८ जूनपासून प्रशासनाने लागू केले नवे नियम.

Bhimashankar Temple – श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने निर्णय घेत भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत थेट दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या वेळेनंतर आलेल्या भाविकांना दर्शन मिळणार नाही. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या मुख्य सभामंडप व पायाभूत सुविधांच्या कामामुळे गेल्या काही महिन्यांपासून दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला होता.
१५ जूनपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असले तरी ऑनलाइन नोंदणी व दर्शन पास अनिवार्य करण्यात आल्याने अनेक भाविकांची गैरसोय झाली होती. पहिल्याच दिवशी यावरून भाविक आणि प्रशासन यांच्यात वादावादीचे प्रकार घडले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून गुरुवार, दि. १८ पासून दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत भाविकांना कोणतीही ऑनलाइन नोंदणी किंवा पास न घेता थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या सोमवारपासून मंदिरात तात्काळ दर्शन सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे. या सेवेसाठी भाविकांना मंदिराच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार असून ही सेवा विनामूल्य असेल.मंदिराच्या मुख्य सभामंडपाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू आहेत. त्यामुळे सकाळी दर्शन सुरू ठेवत सभामंडप त्यावरील डोम व इतर विकासकामेही सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
“भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ केली आहे. भाविकांनी शिस्त राखून सहकार्य करावे. मंदिर परिसरात सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.”
– सागर पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेगाव पोलीस ठाणे.
“भाविकांना कोणतीही अडचण न येता सुलभ दर्शन मिळावे, हा देवस्थानचा प्रयत्न आहे. विकासकामे सुरू असतानाही दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवली जात आहे. लवकरच तात्काळ दर्शन सेवेमुळे भाविकांची अधिक सोय होणार आहे.”
– सुरेश कौदरे,अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट भीमाशंकर मंदिर.






