Ozar News: अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांचा जनसागर लोटला होता. पहाटेपासूनच ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सुमारे दीड लाख भाविकांनी श्री विघ्नहराच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे आणि सर्व विश्वस्त मंडळाच्या शुभहस्ते श्रींना महाअभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी श्रींना सोन्याचे अलंकार आणि रेशमी जरीचा पोशाख परिधान करण्यात आला होता. आकर्षक फुलांची आणि फळांची आरास – अंगारकीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे, विघ्नहर्ता गणेशापुढे ५०१ आंब्यांची आरास गिरीष भोर यांनी, तर १०१ किलो पेरूंची आरास शिवाजी आणि विजय मुळे यांच्या योगदानातून साकारण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते महाआरती – मंदिरामध्ये चतुर्थीनिमित्त विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीचा मान विक्रम गिलबिले, रवींद्र कवडे, सुजय पारवे, रोशन चौधरी, संतोष सूर्यवंशी, संदेश भेके, विवेक खिल्लरी, उद्योजक सुरेंद्र वधवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे आणि बुधाजी शिंगाडे या ११ मान्यवरांना मिळाला. भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा – उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. दर्शन रांगेत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून ‘फॉगर सिस्टिम’द्वारे (पाण्याचे तुषार) थंडावा देण्यात आला. पार्किंग तळावर १०० बाय २०० फुटांचे भव्य पत्राशेड उभारण्यात आले होते. सकाळी १०:३० वाजता भाविकांना ट्रस्टतर्फे खिचडी वाटप करण्यात आले. पिण्याचे पाणी, चप्पल स्टॅन्ड, पार्किंग आणि जलद दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था कार्यान्वित होती. धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल – दिवसभरात मध्यान्ह आरती, पोथी वाचन आणि सायंकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. रात्री चंद्रोदयापर्यंत ह.भ.प. मयुर महाराज बोडके यांचे कीर्तन झाले, ज्याला शिरोली येथील श्रीराम प्रसादिक भजनी मंडळाने साथ दिली. तसेच कुंडलिक रामजी मांडे यांच्या वतीने वारकरी अन्नदान करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देवस्थानच्या विकासकामांसाठी सढळ हस्ते मदत केली. यामध्ये विक्रम गिलबिले आणि राजाराम नथू मांडे यांनी प्रत्येकी २१ हजार रुपयांची देणगी श्री चरणी अर्पण केली. गर्दीचे चोख नियोजन देवस्थानचे व्यवस्थापक, कर्मचारी आणि विश्वस्त मंडळाने यशस्वीरीत्या पार पाडले.